मुंबई-ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ६४ व्या वर्षी फुफ्फुसाच्या संसर्गाने निधन झाले. गेले अनेक दिवस अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ११ वाजता मुंबईतील भाईदास हॉलमध्ये अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
चतुरस्त्र अभिनेता ओळख असणाऱ्या अमरापूरकर यांनी कायमच विविध भूमिकांमधून आपला खास ठसा उमटविला होता. उत्तम चरित्र, खलनायक, विनोदी अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आजवर त्यांनी ३०० सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ‘आमरस’ या मराठी सिनेमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र बॉलिवूडमध्ये ‘खलनायक’ म्हणून अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली होती.
हँड्स अप’ हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. अर्धसत्य, सडक चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.
सदाशिव अमरापूरकर यांना पंतप्रधान मोदी यांनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ‘या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील. जुन्या आणि नव्या पीढीचे ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. कोलकात्यात असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘जेव्हा तुमचा जवळचा सहकारी तुम्हाला कायमचा सोडून जातो तेव्हा एकप्रकारची पोकळी निर्माण होते. काहीशी अशीच अवस्था अमरापूरकर यांच्या जाण्याने झाली आहे. अमरापूरकर यांच्यासोबत घालवलेले अनेक क्षण आज डोळ्यासमोर तरळत आहेत. उपजत गुणवत्ता असलेला एक गुणी कलावंत आपण गमावलाय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, अशा भावना अमिताभ यांनी व्यक्त केल्या.
खासदार सुप्रिया सुळे – चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन झाल्याचे पहाटे समजले आणि अत्यंत वाईट वाटले.
अर्धसत्य ते सडक अशा अनेक चित्रपटांत अत्यंत चोख खलनायक वठवणारे, ऑंखे, इश्क आशा अनेक चित्रटांत कॉमेडीतून आपला ठसा उमटवणारे तात्या अर्थात सदाशिव अमरापूरकर यांचे निधन हे चटका लावणारे आहे. त्यांचे कुटुंबिय आप्त आणि मित्रमंडळी यांच्या दुःखात मी सहभागी आहे. चित्रपटसृष्टी एका हरहुन्नरी, चतुरस्त्र कलाकाराला मुकली आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली.
शरद पवार – सशक्त अभिनय परंपरेशी नाळ असलेले कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचे निधन ही दुःखद घटना असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दिवंगत अमरापूरकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. चतुरस्र अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं हासुद्धा सदाशिव अमरापूरकर यांचा पिंड होता. विविध चळवळी आणि सामाजिक आंदोलनांशी एक कलावंत आणि व्यक्ती म्हणूनही त्यांनी बंध टिकवून ठेवला होता. या मनस्वी कलावांताला भावपूर्ण श्रद्धांजली…