महावितरणकडून शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव
पुणे, दि. 12 मार्च 2021: कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी सुमारे 66 टक्केपर्यंत सवलत देणाऱ्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून पुणे परिमंडल अंतर्गत सात तालुक्यातील 2613 शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीच्या 50 टक्के म्हणजे 5 कोटी 20 लाख रुपयांचा भरणा करून वीजबिल कोरे केले आहे. या सर्व शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र देऊन महावितरणकडून गौरविण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, हवेली (ग्रामीण भाग), जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यात 1 लाख 19 हजार 272 कृषी ग्राहकांकडे एकूण 898 कोटी 43 लाख रुपयांच्या विजबिलांची एकूण थकबाकी आहे. त्यापैकी महावितरणकडून निर्लेखन, विलंब आकार व व्याज माफीचे एकूण 137 कोटी 93 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. उर्वरित सुधारित मूळ थकबाकीच्या 760 कोटी 50 लाखांपैकी येत्या वर्षभरात केवळ 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास शिल्लक 50 टक्के म्हणजे तब्बल 380 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम देखील माफ करण्यात येणार आहे.
थकबाकीमुक्तीच्या योजनेत या सात तालुक्यातील 4255 शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला असून चालू वीजबिलांसह त्यांनी 86 कोटी 77 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. यातील 2613 शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीपैकी 5 कोटी 20 लाख रुपयांची 50 टक्के रक्कम भरून कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त झाले आहेत. यामध्ये मंचर विभागातील 1423, मुळशी- 660 तर राजगुरुनगर विभागातील 530 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आळेफाटा उपविभागातील (मंचर विभाग) 818 शेतकऱ्यांनी या योजनेत आतापर्यंत सहभाग घेतला आहेत त्यापैकी तब्बल 690 शेतकरी 50 टक्के रक्कम भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेत थकबाकीमुक्ती मिळविणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचा महावितरणकडून थकबाकीमुक्ती व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे. तसेच थकबाकीमुक्त झालेल्या महिला शेतकऱ्यांचा तसेच महिला अभियंता व तंत्रज्ञांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरणकडून गौरव करण्यात आला होता. पुणे परिमंडल अंतर्गत विविध कार्यालयांत तसेच गावोगावी कोविड-19 चे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आले.
राज्य शासनाच्या कृषी धोरण 2020 नुसार कृषीपंपधारक शेतकऱ्यांसह लघु व उच्चदाब कृषीग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये येत्या वर्षभरात योजनेप्रमाणे सुधारित मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित सर्व थकबाकी 100 टक्के माफ होणार आहे. यासोबतच कृषी ग्राहकांनी वीजबिलांपोटी भरलेल्या रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत व 33 टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. यातून नवीन उपकेंद्रासह वीज यंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या योजनेत सर्व कृषी ग्राहकांनी सहभागी व्हावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

