पुणे, 8 नोव्हेंबर 2021: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून एकूण 236 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा अश्वमेध हॉल, पुणे येथे दि.9 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा फिडे, एआयसीएफ, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होत असून कोविडबाबतची सर्व काळजी या स्पर्धेदरम्यान घेणार येणार आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक फेरीच्या आधी सॅनिटायझर देण्याची व्यवस्थादेखील आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. खेळाडूने सामन्याच्या वेळी मास्क लावणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. 18 वर्षावरील सहभागी सर्व स्पर्धकांचे लसीकरण प्रमाणपत्र प्रवेशपत्रिकेसोबत घेण्यात आले असून स्पर्धेचे ऑफिशियल(आयोजक, आर्बिटर, स्वयंसेवक इत्यादी)यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 2,00,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये विजेत्याला 50000रुपये, उपविजेत्याला 30000रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 20, 000रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 10,000रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 7, 000रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी नमूद केले.
स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, उत्तरप्रदेश या ठिकाणांहून 236 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 135 रेटेड खेळाडूंचा देखील सहभाग आहे. स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(मुंबई, 2335), डब्लूजीएम स्वाती घाटे(एलआयसी,2170), आदित्य सामंत(राज्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता), सौरभ खेर्डेकर(2246) यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.

