पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकावरील यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
बहुचर्चित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड कॉरिडॉरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार रुपये मंजूर झाले आहे. यासह पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी सर्वाधिक म्हणजे जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बारामती-लोणंदसाठी देखील १ हजार रुपये देऊन हेड खुले करण्यात आले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याला रेल्वेसाठी जवळपास ११ हजार ९०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला गेला आहे. पुण्यासाठी हा अर्थसंकल्प चांगला ठरला आहे. पुणे-मिरज-लोढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी व विद्युतीकरणासाठी कॅपिटल व ईबीआर असे मिळून जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे दुहेरीकरणाच्या कामाला गती येईल.
हडपसर टर्मिनलचा विकास
पुणे स्थानकावर होणाऱ्या गाड्यांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी हडपसर टर्मिनल उभे केले जात आहे. तीन फलाटांच्या विकासासह २ नवे स्टेबलिंग लाईन तयार केली जाणार आहे. तसेच नवे आरआरआय केबिन तयार करण्याचे नियोजन आहे. या २१ कोटींत हडपसर स्थानकाचा कायापालट होणार आहे.
पुणे स्थानकाचे यार्ड रिमोल्डिंग होणार
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यात पुणे स्थानकावरील दोन, तीन व सहा या क्रमांकांचे फलाट २४ डबे बसतील इतक्या लांबीचे होतील. त्यामुळे आता गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.

