सातारा (जिमाका) : नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. या बैठकीत चर्चा होवून 58.49 कोटी वाढीव निधी देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
येथील नियोजन भवनामध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा आज झाली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, महादेव जानकर, बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच सभापती श्री. नाईक-निंबाळकर यांनी राज्यात नव्याने होऊ घातलेल्या 22 जिल्ह्यांबाबत विशेषत: सातारा जिल्ह्यातून प्रस्तावित माणदेश जिल्ह्याबाबत माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, जनमाणसाच्या तसेच आपल्या सर्वांच्या भावना मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. निकष आणि नियमानुसार तसेच सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही पावले उचलली जाणार नाहीत. त्याचबरोबर सातारच्या जिव्हाळ्याचा असणारा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिहे-कटापूर योजना पूर्ण होणार, अशी माहितीही श्री. शिवतारे यांनी सभागृहात दिली.
श्री. शिवतारे पुढे म्हणाले, नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. दि.11 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या आराखड्यावरील योजनांवर चर्चा होवून 197.35 कोटीच्या आराखड्यात 58.49 कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. याप्रमाणे सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सन 2014-15 साठी जिल्ह्यासाठी एकूण 228 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पित तरतूद प्राप्त झाली होती. उपलब्ध प्राप्त तरतूदीपैकी 100 टक्के निधी खर्च झालेला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरीच क्षेत्राचा माहे मार्च 2015 अखेरच्या खर्चाचा अहवाल सादर केला आहे. सन 2014-15 साठी मंजुर अर्थसंकल्पित तरतूद 124.30 कोटी होती. त्यापैकी रुपये 120.30 म्हणजेच रुपये 97.38 टक्के इतका खर्च झालेला आहे.सन 2014-15 साठी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 4812 लक्ष रुपये अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 3909.41 लक्ष रुपये तरतूद प्रत्यक्ष प्राप्त झाली होती. त्यापैकी मार्च 2015 अखेर 3899.21 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. या तीनही उपयोजनांच्या खर्चास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली.
कास पठार येथे स्थलांतरीत शौचालय सुविधा पुरविणे व रस्ता सुधारणा करणे, ओझर्डे धबधबा विकसीत करणे, महाबळेश्वर येथील पॉईंटच्या स्वच्छतेसाठी प्लॅस्टिक विल्हेवाट मशिन पुरविणे, 332 अंगणवाडी इमारत बांधकामास मान्यता देणे तसेच माण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेमधून जिल्ह्यातील न्यायालयाध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसविणे आणि पाझर तलाव दुरुस्तीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
आजच्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, निमंत्रीत, विशेष निमंत्रीत सदस्य उपस्थित होते.
2015-16 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 255.84 कोटी नियतव्यय -पालकमंत्री विजय शिवतारे
Date:

