कायमस्वरुपी खंडित वीजजोडणीला कृषी धोरणाचा लाभ
पुणे, दि. ०३ मार्च २०२२: पुणे व पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रामधील चालू तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या १ हजार ७७० कृषिपंप वीजग्राहकांनी कृषिपंप वीजजोडणी धोरणाचा लाभ घेत वीजबिलांमधून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या कृषी ग्राहकांना थकबाकीच्या रकमेत तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत घेऊन थकबाकीमुक्त होण्याची संधी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्र व लगतच्या परिसरामध्ये चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ६ हजार ८३२ कृषिपंप ग्राहकांकडे वीजबिलांपोटी २६ कोटी ५० लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार त्यातील व्याज, विलंब आकार व महावितरणकडून निर्लेखन तसेच वीजबिल दुरुस्तीचे एकूण ८ कोटी ४८ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कृषिपंप ग्राहकांकडे १८ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास या ग्राहकांना आणखी ९ कोटी रुपयांची अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
आतापर्यंत २ हजार ३४९ कृषिपंप ग्राहक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिल व थकबाकीचा एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. थकबाकीमुक्ती योजनेनुसार त्यांना एकूण २ कोटी ८८ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. योजनेत सहभागीपैकी १ हजार ७७० कृषी ग्राहक वीजबिलांमधून पूर्णतः थकबाकीमुक्त झाले आहेत. या थकबाकीमुक्त ग्राहकांनी चालू व ५० टक्के थकबाकी असा एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे थकबाकीमध्ये त्यांना ५० टक्के म्हणजे १ कोटी ६१ लाख ५४ हजार रुपयांची सवलत देण्यात आली. महावितरणच्या आकुर्डी उपविभागातील १४३, औंध-६६, भोसरी एक व दोन- १६१, चिंचवड- ४७, दापोडी- ६, गणेशखिंड-३०, खडकी- २, प्राधीकरण- २२५, सांगवी- २४४, वारजे- २४, धनकवडी- ३८, हडपसर- ६६, हडपसर एक-३५५, स्वारगेट व मार्केडयार्ड- ३, नगररोड- २०, सेंट मेरी- २४, विश्रांतवाडी- १०८, वडगाव शेरी- २३ तर वडगाव धायरी उपविभागातील १८४ कृषिपंप ग्राहक योजनेचा लाभ घेत थकबाकीमुक्त झाले आहेत.
महावितरणच्या वारजे उपविभागाचे कर्मचारी संगीता शेलार व राहुल रोकडे यांनी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या सुमारे १०० थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना थकबाकीमुक्ती योजनेची माहिती दिली. यामध्ये २४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे. त्यातील थकबाकीमुक्त ग्राहक श्री. ज्ञानोबा ढोणे यांचा अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. महानगर क्षेत्र व लगतच्या चालू तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या कृषिपंप ग्राहकांनी येत्या ३१ मार्चपर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

