पुणे-. प्रशासनाचा करवाढीचा प्रस्ताव फेटाळत मागीलवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत मिळकतकर भरणार्या या मिळकतधारकांनी आगामी आर्थिक वर्षाचा कर ३१ मे २०२१ पर्यंत भरल्यास महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणार्या सर्व उपकरांवर १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.आज महापौरांच्या अँटीचेंबर मध्ये झालेल्या ऑनलाईन खास सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती महापौर ,उपमहापौर, सभागृहनेते ,स्थायी समिती अध्यक्ष यांनी सभेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली .
महापालिका प्रशासनाने मिळकत करात अकरा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला होता. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
- भाजपकडून पुणेकरांना मोठे गिफ्ट
- प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना दिलासा
कोरोना काळात महापालिकेवर विश्वास ठेऊन ज्या नागरिकांनी १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात केवळ ज्या निवासी मिळकत धारकांनी संपूर्ण मिळकत कर भरला आहे अशा निवासी मिळकत धारकांना सण २०२१-२२ च्या बिलांमध्ये शासनाचे कर वगळून सर्व करांमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘ही सवलत जे निवासी मिळवत धारक संपूर्ण मिळकतकर दि. १ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यानच्या कालावधीत भरतील त्यांना ही सवलत लागू होणार आहे. या योजनेत महानगरपालिकेच्या सर्व साधारण कर, सफाई पट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, जलनिस्सारण कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर, शिक्षण उपकर आणि विशेष सफाई कर आदी करांचा समावेश आहे. या योजनेचा फायदा पुणेकरांनी घ्यावा’.

