कराड – ‘देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सत्ताधारी पक्षाचा खासदार त्या आत्महत्या फॅशन बनल्या असल्याचे सांगतो ही शरमेची बाब आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची सामान्य जनतेशी अजिबात नाळ जोडलेली नाही. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण असल्यामुळे आम्ही सत्तेत असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. देश खऱ्या अर्थाने वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांचे हितच पाहणे अधिक महत्वाचे आहे.’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीवाठार, ता. कराड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले . कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
कराड तालुक्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे. कोणालाही अपेक्षित नसताना येथील जनतेने नेहमीच चकीत करणारा कौल दिला आहे. त्यामुळे भविष्यात अविनाश मोहिते यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात अटळ परिवर्तन पाहण्यास मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. नरेंद्र पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मानसिंगराव नाईक, दीपक साळुंखे, सारंग पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांनी पुढे सांगितले की, अपवाद वगळता सातारा जिल्ह्याने नेहमीच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. त्यामुळे माझा येथील जनतेशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. कराड दक्षिणमधील मतदार तसेच नेते यांचे एक वेगळेच वैशिष्ट्य असते. तरीही २०१० साली जेव्हा मला कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांचे पॅनेल विजयी झाल्याची माहित कार्यकर्त्यांकडून मिळाली त्यावेळी आश्चर्य वाटले होते. त्यानंतर कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून अनेकवेळा अविनाश मोहिते यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्वगुण माझ्या लक्षात आले. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या सभासदांना नेहमीच चांगला दर देण्याचा प्रयत्न केला. साखर निर्मिती, इथेनॉल तसेच वीज निर्मितीमध्ये पारदर्शकता ठेउन आदर्श कारभार केला. आबासाहेब मोहिते यांच्याप्रमाणेच अविनाश मोहिते यांनी नेहमीच शेतकर्यांचे हित पाहिले. गेल्या वर्षी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत मात्र शासकीय यंत्रणेवर अविनाश मोहिते यांनी अधिकच विश्वास दाखवल्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. परंतु या पराभवानंतरही ते खचून गेले नाहीत. कृष्णा कारखान्याच्या आताच्या चेअरमनांची ऊस दर नियंत्रण समितीवर निवड झाली आहे. त्यामुळे ते शेतकर्यांना अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.
गटनेते जयंत पाटील म्हणाले, अविनाश मोहिते कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी पोहचलेले नेतृत्व आहे. आपल्या नम्र स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतीमालाचे दर सातत्याने घसरत आहेत. यापूर्वी शेतकरऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना आता मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. शरद पवार यांनी मंत्रीपदी असताना शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले होते.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, अविनाश मोहिते यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत राष्ट्रवादीला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. विरोधकांच्या फोडा आणि झोडा या नीतीला अविनाश मोहिते उत्तर देतील.
शशिकांत शिंदे म्हणाले, अविनाश मोहिते यांच्या पक्षप्रवेशाने कराड दक्षिणच्या बदलत्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू होतोय. वाठार येथील हा मेळावा इतिहासाची नांदी ठरेल. विलासराव पाटील-वाठारकर यांच्या निधनानंतर दक्षिणेत पक्ष दुबळा झाला होता. आता अविनाश मोहिते रुपाने कणखर सरदार मिळाला आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत २०१० मध्ये दिग्गजांचा पराभव करून अविनाश मोहितेंनी इतिहास घडविला. या निवडणुकीत मात्र अविनाश मोहिते यांचा पराभव जनतेने नाही तर यांत्रिक विभाागने केला आहे. यामध्ये लातूरच्या अधिकाऱ्यांने घोटाळा केला असल्याचा अरोपही त्यांनी यावेळी केला.
अविनाश मोहिते म्हणाले, शरद पवार यांनी आपणास सातत्याने सहकार्य केले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय महत्वाकांक्षेशिवाय आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सध्या कृषी क्षेत्रावर मोठे संकट असताना राष्ट्रवादीच्या धोरणांशिवाय पर्याय नाही. कराड दक्षिणेत मतदारांची फसवणूक करण्यात आली आहे. विकासाची यात्रा म्हणवणार्यांनी आपली यात्रा शेवटी वाममार्गापर्यंतच पोहचवली.
आ. बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुनिल माने यांनी आभार मानले.

