मुंबई – ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…‘ म्हणत सहज, सोप्या भाषेतून वाचकाला जगण्याचे बळ देणारे, नवी ऊर्मी देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर (वय 86) यांचे आज (बुधवार) सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
मंगेश पाडगावकर यांची अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राला प्रेम शिकविणारा कवी हरपला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. पाडगावकर यांना ‘सलाम‘ या कवितासंग्रहासाठी यांना 1980 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण, 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पाडगांवकरांचा जन्म 10 मार्च 1929 ला वेंगुर्ला येथे झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. त्यानंतर त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले. ते 2010 मध्ये झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे असा संदेश देत त्यांनी विझलेल्या मनांमध्ये जगण्यासाठीची एक अनावर ऊर्मी त्यांनी भरली. या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे, असे म्हणत त्यांनी सृष्टीची महती, मानवाचे अस्तित्व दाखवून दिले.काव्यदर्शन, उत्सव, सलाम, गझाला, बोलगाणी, भटके पक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, नवे दिवस, जिप्सी, मीरा, सूरदास, राधा या त्यांच्या काव्यसंग्रहांनी मराठी रसिकांच्या मनावर साम्राज्य गाजवले. बोलगाणीने तर विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले.प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते, या एका ओळीवर तरुणाईच्या अंगावर काटा फुलला.सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा, असा प्रश्न विचारत त्यांनी सर्वसामान्यांना प्राप्त परिस्थितीला तोंड देत जगणे शिकवले.
मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता –
– सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
– फूल ठेवूनि गेले
– सलाम
– सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
– जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
– आम्लेट
– दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
– अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
– प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो
– नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
– असा बेभान हा वारा
– मी बोलले न काही नुसतेच पाहिले
– आतां उजाडेल !
– सांगा कसं जगायचं
– अफाट आकाश