पुणे- पुण्यामध्ये अनेक उत्सवांच्या माध्यमातून तरुण कलाकारांची उर्जा दिसते. त्यांना कलेचे पद्धतशीर शिक्षण
मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुण्यातील ललीत कला केंद्रांसारख्या कला केंद्रांना शासनाने अनुदान देऊन
पाठबळ द्यावे अशी सूचना जेष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी केली.
कला, गायन, वादन, संगीत, नाट्य यांचा मनोहारी मिलाफ असणाऱ्या शनिवारवाडा कलामहोत्सवाचे जेष्ठ संगीतकार व
प्रख्यात व्हायोलीनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी आळेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. या महोत्सवाचे संयोजक आमदार विजय काळे, श्री संत दर्शन मंडळाचे श्रीराम साठे,
अजय धोंगडे, प्रमोद रानडे, प्रल्हाद तापकीर आदी यावेळी उपस्थित होते. प्रसिध्द गायिका अनुराधा मराठे, प्रख्यात
तबला वादक राजू जावळकर तसेच गेली ५० वर्षांपासून भजन, भक्तीगीत आणि संगीत क्षेत्रात कार्यरत श्री संत दर्शन
मंडळ यांचा या उद्घाटन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला.
आळेकर म्हणाले,पुणे शहर हे तरुणांचे, शिक्षणाचे शहर त्याचप्रमाणे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
पुण्यामध्ये गल्लोगल्ली निरनिराळे उत्सव होत असतात. त्यातून तरुणांच्या उर्जेला वाट मिळते. मात्र, तरीही त्यांचे
विचार प्रगल्भ व्हायला अहुनही वाव आहे. पूर्वी नाटक, चित्रपटाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सोय नव्हती. परंतु ललीत कला
केंद्रासारख्या संस्था आता अशाप्रकारचे प्रशिक्षण देत आहेत. मात्र हे शिक्षण अनुदानित तत्वावर मिळण्यासाठी
लोकनियुक्त सरकारचे पाठबळ मिळत नाही. ‘फिल्म इन्स्टिट्यूट’ सारखी संस्था यासाठी केवळ पुरेशी नाही. पुण्यातील
अशा प्रकारचे कलेचे शिक्षण देणाऱ्या केंद्रांना अनुदान देऊन सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे धोरण
शासनाने आखावे अशी सूचना आळेकर यांनी केली.
पुणे शहरात नाट्य गृहांची व्याप्ती मोठी आहे. परंतु त्याच्या देखभालीबद्दल काहीच केले जात नाही. त्यासाठी तिकिटामागे
एक रुपया बाजूला काढून त्यातून देखभालीसाठी फंड उभा करण्याची आवश्यकता आहे असे सांगून आळेकर म्हणाले,
नाट्यगृहातील विंगेतील व्यवस्था चोख असेल तर कार्यक्रम अथवा मैफल चांगली रंगते असा अनुभव आहे. त्यामुळे सादर
करण्याची कला जोपासण्यासाठी शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे.
प्रभाकर जोग यांनी शनिवार वाडा महोत्सवाला शुभेच्छा देत या महोत्सवाच्या माध्यमातून नवनवीन कलाकार निर्माण
व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
अनुराधा मराठे म्हणाल्या, गाण्याच्या क्षेत्रात अनेक दिग्गज गुरु मला लाभले. म्हणून आजपर्यंतची वाटचाल मी करू
शकले. संगीत हे फक्त गळ्याचे काम नाही तर नाटक, भाषेचा अभ्यास व आतून असलेला अनुभव असणाऱ्या शिक्षणाचा
हा एकत्रित परिणाम आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित समुदाय असल्याखेरीज कुठलीही कला अभिव्यक्त करता येत नाही.
विजय काळे यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सन २००० साली शनिवारवाडा
महोत्सवाची सुरुवात झाली. ते वर्ष सोडले तर आजपर्यंत महोत्सवाचे उद्घाटन कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते न
करता कलाकाराच्या हस्तेच करण्याची परंपरा पाळली असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन
देऊन त्यांना या क्षेत्रात स्थान मिळवून देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढच्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात
कलाकारांना व सत्कारार्थीना बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘स्वरश्री’ पुणे निर्मित सुवर्णकाळ गाजविलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या ‘सुहाना सफर’ या मैफिलीने
महोत्सवात रंगत आणली. सुवर्णा माटेगावकर, स्वरदा गोखले व संदीप उबाळे यांनी ‘ तू प्यारका सागर है…’, ‘ सुहाना
सफर…’, ‘ मधुबन मे राधिका नाचे रे….’, ‘नैना बरसे रिमझिम….,’ ‘गोरी तेरा गांव…’, ‘ गुलाबी आँखे…..’,
‘सावन का महीना…..’, ‘पान खाए सइंया….’,
व ‘इन्ही लोगोने…’ यांसारख्या गाण्यांच्या गायनातून जुन्या सुमधुर स्मृतींना उजाला दिला. कार्यक्रमाची
सांगता सुवर्णा माटेगावकर यांच्या वंदे मातरम्… गायनाने झाली
पुणेकरांनी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शुक्रवारी २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३०
वाजता ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका मंजुषा पाटील यांची शास्त्रीय व सुगम संगीताची मैफिल
सादर होणार आहे. या मैफिलीचा पुणेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे संयोजक आमदार
विजय काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रख्यात निवेदक मंगेश वाघमारे यांनी केले.