बेंगळुरू-
ज्ञानज्योति ऑडिटोरिअममध्ये आदरणीय शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा नयनरम्य सोहळा बेंगळुरू शहरात दि. १८ डिसेंबरच्या सायंकाळी दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया, माजी पंतप्रधान एच. डी. देवे गौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. के. जाफर शरीफ उपस्थित होते.
श्री. पवार यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभानंतर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया म्हणाले, “मी कृषी विषयाशी निगडित कोणताही अडचण आली की नेहमीच पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी धाव घेत असे. त्यांनी कधीच अपेक्षाभंग केला नाही. त्यांनी केंद्रातून नेहमीच मदतीची भूमिका घेतली.”
माननीय पवारसाहेबांकडे देशाचे पंतप्रधानपद किंवा सर्वोच्च असे पद भूषवण्याची क्षमता आहे असे गौरवोद्गारही या प्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया यांनी काढले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचे सूत्र घेऊन माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, “येत्या २०१६-१७ मध्ये देश राजकीय ध्रुवीकरणाचा साक्षीदार राहील आणि हे ध्रुवीकरण कुणीच हे थांबवू शकणार नाही. माजी पंतप्रधान या नात्याने मी निरीक्षण नोंदवत आहे आणि म्हणूनच श्री. पवार हे पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत असं मी म्हणू शकतो.”
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांनीही आदरणीय पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नेहमीच आघाडीवर असल्याचं नमूद केलं, मात्र केवळ काही घटनांमुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वोच्च नेत्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली असे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. के. जाफर शरीफ यांनीही त्यावेळी १९९१ साली ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांनाच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून शिक्कामोर्तब केले होते, असे आवर्जून सांगितले. मात्र काही अचानक उद्भवलेल्या घटनाक्रमामुळे पी. व्ही. नरसिंह राव यांची निवड झाल्याचे नमूद केले.
माननीय शरद पवार यांनी या सत्काराला उत्तर देताना विनम्रपूर्वक सांगितले की देशातील जनता राजकीय नेत्यांपेक्षाही चतुर आहे आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. आपल्या कृषि मंत्रालयातील कारकीर्दीचा आढावा घेताना त्यांनी कर्नाटकातील जनतेला आवर्जून सांगितले की आपण एकेकाळी अन्नाची आयात करणारा देश होतो. आज फळं, भाज्या आणि गव्हाची निर्यात करणारा मोठा देश म्हणून जगात आपले स्थान आहे.
मात्र सद्यस्थितीतील संसदीय कामकाजाविषयीही त्यांनी विशेष टिप्पणी केली. एक दिवस सोडला तर यावेळी अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. याची खंत व्यक्त करून पवार साहेब म्हणाले की दरदिवशी हंगामा असायचा. आपण कोणता संदेश देशाच्या जनतेला देत आहोत. लोकांना संसद सदस्यानी योग्यरीतीने काम करण्याची अपेक्षा आहे. संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी सर्व सुज्ञांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री पी.जी.आर. सिंधिया यांनी या सोहळ्याचे आयोजन केले

