पुणे: (कंन्टेट कन्सेट कम्युनिकेशन्स कडून )
“दिलीप वळसे पाटील यांची तब्येत आता उत्तम आहे. येत्या एक – दोन
दिवसातच त्यांना रुबी हॉल रूग्णालायातून डिस्चार्ज (रजा) मिळेल, अशी माहिती
रूबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रान्ट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वळसे-पाटील यांच्या हृदयामध्ये बसवलेले पेसमेकर आता दुरूस्त (रिप्रोग्राम)
करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा बघून अतिशय आनंद होत
असल्याचे डॉ. ग्रान्ट यांनी यावेळी सांगितले. व्हाटस् अप वर सध्या वळसे-पाटील
यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट माहिती दिली जात होती. त्यांच्या प्रकृतीविषयीच्या
चूकीच्या अफवा रोखण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे डॉ. ग्रान्ट यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस अप या सोशल मिडियामधून दिलीप वळसे-
पाटील यांच्या प्रकृतीबाबत दोन दिवसांपासून चूकीची माहिती दिली जात आहे. या
चूकीच्या माहितीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व राजकारणी लोकांमध्ये
चिंतेचे वातावरण पसरल्यामुळे सातत्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली
जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वळसे पाटील यांना १३ डिसेंबरला कात्रज दुध संघातर्फे
आयोजित कार्यक्रमाच्या वेळी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना
रूग्णालयामध्ये दाखल केले होते. “त्यांच्या हृदयामध्ये बसविलेल्या ‘पेसमेकर’ मधील
समस्येमुळे वळसे पाटील यांना रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
रूग्णालयात आधी त्यांना आयसीयुमध्ये भरती करण्यात आले होते. पण आता
त्यांना वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली
असून, एक किंवा दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज (रजा) मिळू शकेल. त्यांच्या
हृदयाचे ठोके थोडेसे अनियमित असल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात
आले होते, अशी माहिती डॉ.ग्रान्ट यांनी दिली.
औषधोपचारामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सध्यातरी मला
त्यांच्या प्रकृतीमध्ये कुठलीही गंभीर समस्या वाटत नाही. तीन महिन्यापूर्वी
कार्डीएक सिटी केली होती तेव्हाही त्यांची प्रकृती उत्तम होती.” अशी माहिती
डॉ.परवेझ ग्रॉन्ट यांनी पत्रकारांना दिली.
“गेल्या रविवारी माझे भाषण सुरु असताना मला थोडा त्रास झाला.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी उपचार केल्याने मी पूर्णपणे बरा झालो
आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार येत्या दोन-तीन दिवस आराम केल्यावर लगेचच
माझ्या कामांना सुरुवात करीन. माझ्या तब्येतीचा अडथळा माझ्या कुठल्याही
कामांवर पडू देणार नाही. ” अशी भावना वळसे-पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी
बोलताना व्यक्त केली.
पाच वर्षांपुर्वी वळसे-पाटील यांच्या ह्रद्याच्या ठोक्यामध्ये अनियमितता होती.
त्यामुळे अमेरिकेत त्यांच्या ह्रद्यामध्ये पेसमेकर बसवण्यात आले होते. ह्रद्याचे ठोके
अनियमित झाल्यावरच हे अत्याधुनिक पेसमेकर बसवले जाते. ह्रद्याचे ठोके जेव्हा
अनियमित होतात, तेव्हाच हे पेसमेकर कार्यरत होते. बाकी इतरवेळी हे
पेसमेकर’स्लीपिंग मोड’ मध्ये असते.
गेल्या रविवारी वळसे पाटील यांचे भाषण सुरु असताना पेसमेकरने त्यांना
अनियमित हृदयाच्या ठोक्यांमुळे पहिला झटका दिला, त्यानंतर तसाच दुसरा झटका
मिळाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. साधारणत: पेसमेकरचे
जीवन चक्र ७० ते ८० मायक्रोस्कोपिक झटके देण्यापर्यंतचे असते, अशी माहिती डॉ.
ग्रान्ट यांनी दिली.
” दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीबाबतच्या अफवेची तक्रार पुण्याच्या
सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. रुबी हॉल कडून मिळालेली माहितीच
अधिकृत असून बाकी कुठल्याही स्त्रोताकडून मिळालेली माहिती चुकीची आहे.
त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.” असे आवाहन वळसे पाटील
कुटुंबीयांनी केले आहे.