मुंबई- हिट अॅंड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने आज अखेर निर्दोष मुक्त केले आहे . मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ए. आर. जोशी यांनी याप्रकरणाचा आज दुपारी दीड वाजता अंतिम निर्णय दिला. हिट अॅंड रन प्रकणात सलमान खानविरोधात कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत. मुंबई पोलिसांनी सक्षम पुरावे कोर्टात सादर केले नाहीत असे कारण हायकोर्टाने दिले आहे.
या निकालानंतर सामाजिक कार्यकर्त्या व वकिल आभा सिंह यांनी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार रविंद्र पाटलांचा मृत्यू झाल्याने त्याची साक्ष ग्राह्य न धरणे धक्कादायक असल्याचे सांगून सलमान खानवर मेहरबानी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेचआभा सिंह यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा सविस्तर निकाल पाहून सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत विचार करू असेही आभा सिंह यांनी म्हटले आहे.
, आज सकाळी ११ वाजता न्यायाधिश ए. आर. जोशी यांनी आरोपी सलमान खानला कोर्टात निकालाच्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले होते. सलमान खान आज सकाळी शुटिंगच्या कारणाने मुंबईच्या बाहेर होता मात्र कोर्टाच्या आदेशानंतर तो दोन तासात कोर्टात पोहचला दुपारी १;३० वाजता तो कोर्टात हजर झाला. त्यानंतर पाच मिनिटांतच कोर्टाने त्याला सर्व आरोपातून दोषमुक्त केले. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी सलमानचे वडील सलीम खान, सलमानचा मित्र व स्थानिक आमदार बाबा सिद्दीकी, बहिण अलविरा, सलमानची मॅनेजर रेश्मा शेट्टी आदी कोर्टात हजर होते.
सलमान खान दारू पिऊन गाडी चालवत होता हे सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला अपयशी ठरला आहे. त्या रात्री सलमानच गाडी चालवत होता हेदेखील सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही असे मत न्यायाधिश ए. आर. जोशी यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे सलमान खान हिट अॅँड रन प्रकरणातून सहज सुटणार असल्याचे बोलले जात होते . त्यानुसारच मुंबई हायकोर्टाने निकाल दिला आहे.
२८सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्री अपघात झाल्यानंतर या प्रकरणातील मृत मुख्य साक्षीदार व सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने सलमानविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, तो मद्याच्या अमलाखाली गाडी चालवत होता का? याचा उल्लेख कुठेही केला नाही. सलमानच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाटील यांनी सलमानने दारू प्राशन करून गाडी चालवल्याची साक्ष न्यायालयात दिली. या खटल्यात पाटील यांची साक्ष कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राह्य धरता येणार नाही. रवींद्र पाटील यांचा २००७ मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे याआधी त्यांनी दिलेले जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. त्या वेळी सत्र न्यायालयाने पाटील यांची साक्ष ग्राह्य धरत सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, पाटील सध्या साक्ष देण्यासाठी हयात नसल्याचे सलमानच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.
सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वीच गाडीचा टायर फुटला की अपघातानंतर फुटला याबद्दल न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे आहेत. वास्तविक फिर्यादी पक्षाने टायर फुटण्याच्या प्रक्रियेचा प्रयोग शाळेतून तांत्रिक अहवाल मागवायला हवा होता असेही न्यायमूर्ती जोशी यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे.
सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वीच गाडीचा टायर फुटला की अपघातानंतर फुटला याबद्दल न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे आहेत. वास्तविक फिर्यादी पक्षाने टायर फुटण्याच्या प्रक्रियेचा प्रयोग शाळेतून तांत्रिक अहवाल मागवायला हवा होता असेही न्यायमूर्ती जोशी यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे.
या प्रकरणात सलमानचा गायक मित्र कमाल खान हा महत्त्वाचा साक्षीदार ठरतो. फिर्यादी पक्षाने त्याला साक्षीसाठी बोलवायला हवे होते. सरकारी वकिलांनी ही चांगली संधी गमावल्याचा ठपका ठेवून न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.

