पुणे :
खेड्यातून मेगासिटीकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी देशातील 1000 जिल्हा केंद्रे प्रादेशिक संतुलित विकासाचा विचार केंद्रीभूत धरून ‘हरित विकसित शहरे’ करण्याची गरज आहे. त्यातून 70 टक्के राष्ट्रीय संपत्ती छोट्या शहरातून तयार होऊ शकेल’ असे प्रतिपादन ‘मित्र’ (मिशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ रूबन एरिया) संस्थेचे प्रमुख अनंतराव अभंग यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक स्व. डॉ. वि. वि. तथा अप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला काल ज्ञानप्रबोधिनीत प्रारंभ झाला. यानिमित्त ‘रूप पालटू देशाचे’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील प्रारंभीचे पुष्प अनंतराव अभंग यांनी गुंफले ‘एक हजार विकसित शहरे’ या विषयावर ते बोलत होते.
अनंतराव अभंग म्हणाले, ‘भारतात विकसनात्मक तत्त्वज्ञान (डेव्हलपमेंन्टल आयडियॉलॉजी) ची कमतरता आहे. त्यातून मोठ्या शहरांना आणखी खर्च करून मोठे बनवले जात आहे. त्या खर्चाच्या एक दशांश खर्चात जिल्हा केंद्रांसारखी प्रादेशिक समतोल विकास असलेली एक हजार हरित शहरे निर्माण होऊ शकतात.
त्यातून मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखता येईल. खेड्यांकडील रोजगार कमी झाल्याने थेट मोठ्या शहरांकडे स्थलांतर होत आहे. जिल्हा केंद्रे रोजगारासह विकसित केल्यास खेड्यातील युवकांना जिल्हा केंद्राच्या ठिकाणी रोजगार मिळेल, गावाकडे शेतीही करता येईल. यादृष्टीने हरीत उद्योग क्रांती देखील होण्याची गरज आहे.
भविष्यात 50 टक्के भारताचे शहरीकरण होण्याचा धोका आहे. 40 टक्के लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. शहरात 80 कोटी लोकसंख्या राहील. पुण्याची लोकसंख्या 2 कोटी होईल. 20 वर्षांनी 40 कोटी विद्यार्थी शिक्षण घेतील. त्यातील 30 कोटी विद्यार्थ्यांना सेमी स्किल्ड, अनस्किल्ड प्रकारचा रोजगार निर्माण करावा लागेल.
यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करावे लागेल. ‘मित्र’ संस्था यासाठी काम करीत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
या व्याख्यानमालेत डॉ. सचिन गांधी यांनी ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरोउपचार’ या विषयावर व्याख्यान दिले. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. विवेक कुलकर्णी, प्रा. राम डिंबळे, अजित कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

