मुंबई- ‘सत्याच्या मोर्चा’त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर घणाघाती प्रहार केला. ॲनाकोंडाला आता कोंडावंच लागेल, नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि दुबार नोंदींचा मुद्दा उचलत त्यांनी राज्यकर्त्यांवर आणि निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला. रोज कुठून तरी पुरावे समोर येत आहेत, तरीही सरकार आणि आयोग गप्प आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आपला पक्ष, नाव आणि निशाणी चोरली गेली, आता मतचोरी सुरू आहे, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न झाला, पण ते पुरलं नाही म्हणून आता मतचोरीकडे वळले आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांचा पर्दाफाश करू. मी देवेंद्र फडणवीस यांना खुलेआम आव्हान देतो की, करा ना पर्दाफाश! आम्ही कसे फायद्यात आहोत, ते दाखवा.
मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतात, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी मतचोरी मान्य केली आहे, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचंही सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं. ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, तर लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, असं सांगत त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तीव्र इशारा दिला.

