पोरबंदर किनाऱ्याजवळ घुसखोरी करणारी पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली असून बोटीवरील ८ तस्करांना अटक करण्यात आली आहे. या बोटीत तब्बल ६०० कोटी किंमतीचे २५० किलो हेरॉइन आढळून आले असून सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आला आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
इंटेलिजन्सकडून या बोटबाबत आधीच सुरक्षा यंत्रणांना इनपूट्स देण्यात आले होते. त्यानुसार तटरक्षक दलाची संग्राम ही युद्धनौका तसेच नौदलाचे डोर्नियर विमान शनिवारपासूनच समुद्रमार्गे पोरबंदर किनारपट्टीच्या दिशेने येणाऱ्या या बोटवर पाळत ठेऊन होते. पोरबंदरजवळ ही बोट धडकताच बोटीला चहुबाजून घेरून ताब्यात घेण्यात आले. बोटीतील आठही जण कोणताही प्रतिकार न करता सुरक्षा यंत्रणांना शरण आले. त्यामुळे हे तस्करच असावेत, असे प्रथमदर्शनी तरी दिसत आहेत. अटक केलेल्या आठ जणांपैकी पाच जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच पोरबंदरपासून ३६५ सागरी मैलावर एका घुसखोर पाकिस्तानी बोटवर तटरक्षक दलाने कारवाई केली होती. ही बोट भारतीय हद्दीत घुसल्याने तटरक्षक दलाने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्ग बदलून ही बोट कराचीच्या दिशेने वेगाने पळण्याचा प्रयत्न करू लागल्याने तटरक्षक दलाने ही बोट उडवून दिली होती. या कारवाईत बोटीतील चौघे जण ठार झाले होते. या कारवाईवरून नंतर बरंच काहूर माजलं होते. या बोटीत दहशतवादी होते की नाही?, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे. अशावेळी पोरबंदरजवळच पुन्हा एक पाकिस्तानी बोट पकडली गेल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
६०० कोटी किंमतीचे २५० किलो हेरॉइन पाकिस्तानी बोटीतून पकडले
पोरबंदर