दिलीप वळसे पाटील यांनी प्रकाशित केलेल्या विकासपर्व या पुस्तिकेवर टीका करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले होते, की राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवत असल्याप्रमाणे हा अहवाल छापला आहे. याला प्रत्युत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे विधानसभेचा अध्यक्ष असलो, तरी माझी पहिली जबाबदारी आपल्या मतदारसंघाची होती. त्याचा एकूण गोषवारा लोकांपुढे ठेवणे, हे माझे कर्तव्य आहे. त्यामागे माझी भावना अत्यंत विनम्रपणाची आहे. ज्यांनी मला विश्वासाने व प्रेमाने पाच वेळेस निवडून दिले, त्यांचा विश्वास खरा ठरला की नाही हे जाणण्याचा त्यांना हक्क आहे. त्यामुळे केवळ कर्तव्य भावनेमधून आणि आपल्या भागात काय झाले आहे, काय होणार आहे, हे लोकांना कळण्यासाठीच अहवाल दिला आहे, असे पाटील म्हणाले.
मी नेहमी कामाच्या आधारे जनतेचा कौल मागितला. या पाच वर्षांत अनेक योजना यशस्वी केल्या. शेती, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामातून मतदारसंघाचे रूप कसे पालटले आहे, हे दाखविणे हा प्रयत्न विकासपर्व प्रसिद्ध करण्यामागील आहे. जनतेच्या प्रेमाचा उतराई होण्यासाठीच कामाचा अहवाल प्रसिद्ध केला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
त्यामागची भावना ज्यांना समजलेली नाही ते राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ जोडून खिजवत आहेत. यातून ते मतदारांबद्दल अनादर व्यक्त करून राष्ट्रपती पदाचीही अप्रतिष्ठा करत आहेत. ते पुढे म्हणाले, की वास्तविक ही कामे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यांची केवळ आठवण व्हावी, म्हणून अहवाल सादर केला आहे