- ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे हृदय स्पर्शी संवाद !
- कोकणातील दशावतारी लोककलेचा खुमासदार वापर !
- चाहत्यांना अभिजात संगीताची मेजवानी :- रुपकुमार राठोड, आरती अंकलीकर –टीकेकर , बेला शेंडे यांनी गायली गाणी !
- गुरु ठाकूर, मकरंद सावंत यांच्या अर्थपूर्ण शब्दरचनांना संगीतकार विजय नारायण, नंदू घाणेकर यांच्या कर्णमधुर संगीताची सुरेल साथ!
सिनेसृष्टीच्या उगमापासून जे आज पावेतो दमदार कथानक आणि पोषक वातावरणाची जोड मराठी सिनेमाचा आत्मा राहिला आहे. बॉलीवूड पासून ते हॉलीवूडपर्यंत सार्यांनीच मान्य केले आहे. शाली हा आगामी सिनेमा याच पठडीतील ठरणार आहे.दिग्दर्शक अतुल साटम यांच्या ‘शाली’ सिनेमात रसिकांना दमदार कथानकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला आणि मानवी व्यक्तिरेखांचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
कनक एन्टरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. कै. शंकर पाटील यांच्या ‘शारी’ या कथेने प्रेरित होऊन अतुल साटम यांनी लिहिलेल्या पटकथेवर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संवाद लेखन केले असून, विख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या विशेष भूमिका आहेत.
‘शाली’चे लेखक दिग्दर्शक अतुल साटम हे गेली २५ वर्षे हौशी, प्रायोगिक, व्यवसायिक रंगभूमि आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ब-याच शॉर्टफिल्म्स्, डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलेले आहे. काही चित्रपट दिग्दर्शकांसोबत सहदिग्दर्शकाचं काम केलं आहे. या खेरीज विविध सामाजिक संस्थांसोबतही ते कार्यरत आहेत. कोकणसारख्या निसर्गसंपन्न लोकेशन्सवर शालीचे सौदर्य अधिक खुलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
`शाली’ हा मराठी चित्रपट आशयघन कथानकासोबतच कर्णमधुर संगीतामुळेही सिनेरसिकांच्या स्मरणात रहाणार आहे. रुपकुमार राठोड, आरती अंकलीकर – टिकेकर, बेला शेंडे या दिग्गज गायकांच्या आवाजातील गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. या चित्रपटातील दोन गाण्यांसाठी दोन निष्णात संगीतकारांची निवड केली गेली आहे. विजय नारायण आणि नंदकुमार घाणेकर या संगीतकारांनी या चित्रपटाला सुमधुर संगीताचा साज चढवला आहे. लोकप्रिय गायक रुपकुमार राठोड यांनी `नाही सांगणे काही अनंता, सर्व तुला ठावे…’ हे भजन गायलं आहे. तर फीमेल व्हर्जनमधील हे भजन आघाडीची गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात अधिकच रसाळ झाले आहे. गुरु ठाकूर यांच्या समृध्द लेखणीतून उमटलेल्या या भजनगीताला संगीतकार विजय नारायण यांनी संगीतसाज चढवला आहे.
तर `पापण्याच्या भोवताली, सावल्यांची साद आली…’ ही गीतकार मकरंद सावंत यांच्या लेखणीतून आकाराला आलेली गीतरचना आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायली आहे. संगीतकार नंदू घाणेकर यांनी संगीतबध्द केली आहे. `शाली’ सिनेमाचा आत्मा असलेलं हे गीत अत्यंत सुरेख असून शब्द आणि संगीताची जुगलबंदी रंगल्याचे रसिकांना नक्कीच जाणवेल.
कनक एन्टरटेन्मेंत बॅनरखाली निर्माते जयसिंग साटम यांनी ‘शाली’ चित्रपटाची निर्मिती केली असून कथा विस्तार, पटकथा आणि दिग्दर्शन अतुल साटम यांचे आहे. पंचविशीतल्या एका सुशील, शालीन, बुध्दिवान तसेच कर्तव्यनिष्ठ मुलीभोवती शालीची कथा फिरते. तिचे भावविश्व पडद्यावर रेखाटताना आजूबाजूला घडणा-या घटनांचा वेधही या सिनेमात घेण्यात आला आहे. या सिनेमातील कालखंड १९७०-८०च्या दशकातील असून कथेला कोकणची पार्श्वभूमी लाभली आहे. त्या अनुषंगाने कोकणामध्ये मनोरंजनासोबतच पौराणिक कथा सादर करण्याचा वसा जपणा-या दशावतारी नाट्याचा अविष्कार दादा कोणस्कर-राणे या प्रसिध्द दशावतारी कलावांताने `शाली’ तून घडविला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक युगात पडद्याआड गेलेला दशावतारी थाट `शाली’च्या निमित्ताने रसिकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये चेतना भट, विजय गोखले, संजीवनी जाधव, दिगंबर नाईक, जयवंत वाडकर, शिवकांता सुतार, गनेश माने, अभय खडपकर व बालकलाकार साहिल गावकर तसेच दशावतारी कलावंत दादा राणे ऊर्फ दादा कोणस्कर इत्यादी कलावंताच्या प्रमुख भुमिका आहेत. शालीचं छायाचित्रण सुरेंद्र सिंग यांनी केले आहे तर कलादिग्दर्शन अल्हाद साटम यांचे असून कार्यकारी निर्मिती शंकर धुरी यांची आहे.

