आपल्या विलक्षण प्रतिभेने हिंदी चित्रपट संगीतात सुवर्णकाळ निर्माण करणाऱ्या संगीतकारांमधील आघाडीचं नाव म्हणजे कल्याणजी आनंदजी..! शेकडो चित्रपटांतील हजारो सुमधुर गीतांतून या जोडीने रसिकांचे अपार मनोरंजन केले.
या जोडगोळीने संगीत दिलेल्या गाण्याचे संकलन ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट्स’ या डीव्हीडी च्या रुपात शेमारू एण्टरटेनमेन्टने प्रकाशित केले आहे. नुकतेच या डीव्हीडी चे अनावरण ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आनंदजी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संगीत दिग्दर्शक कल्याणजी यांचे सुपुत्र विजू शहा, शेमारू एण्टरटेनमेन्टचे अध्यक्ष बुद्धीचंद मारू आणि शेमारू एण्टरटेनमेन्टचे व्यवस्थापकीय संचालक अतुल मारू उपस्थित होते.
शेमारू एण्टरटेनमेन्टने विविध मूडमधली गाणी संकलित करून जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे मनोगत आनंदजीनी व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शेमारू एण्टरटेनमेन्टने ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट्स’ या डीव्हीडीचे अनावरण करून आपले रजत वर्ष साजरे केले.
कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी निवडक १०१ गीते तीन डीव्हीडीच्या संचात संग्रहित केली आहेत. या डीव्हीडी मध्ये कल्याणजी आनंदजी यांच्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाची मनोरंजक माहितीही समाविष्ठ करण्यात आली आहे. जंजीर, ब्लॅकमेल सारख्या चित्रपटात गाण्यांना जराही वाव नसताना या जोडीने त्यात सिच्युएशन्स निर्माण करून गाणी दिली आणि ती सगळी गाणी हिट झाली त्या गाण्यांचाही समावेश या डीव्हीडी मध्ये आहे.
छलिया, ब्लफमास्टर, सरस्वतीचंद्र पासून सफर, ब्लॅकमेल, जंजीर, मुक्कदर का सिकंदर, लावारिस आदी गाजलेल्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांची जादू ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट’ या डीव्हीडीच्या रुपात पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे.