पुणे-१०० वा माहिती अधिकार कट्टा काल मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटीका येथे पार पडला.दोन वर्षांपूर्वी म्हणजे ४ जानेवारी २०१३ रोजी माहिती अधिकार कट्टा सुरू करण्यात आला होता. माहिती अधिकाराच्या अधिकाधिक प्रचार प्रसारासाठी आणि सामान्य माणसाला या कायद्याचा वापर करताना आवश्यक ते मार्गदर्शन व माहिती सहजपणे मिळावी, कोणावरही अवलंबून न रहाता परस्पर सहका-याने माहिती अधिकाराचा व्यापक प्रचार – प्रसार व्हावा तसेच प्रत्येक सामान्य माणूस माहिती अधिकाराच्या बाबतीत सबल – आत्मनिर्भर व्हावा हा या कट्ट्यामागचा उद्देश होता. या ठिकाणी कोणीही येउन आपली माहिती अधिकार विषयक अडचणी मांडू शकतो आणि त्यावर उपस्थितांपैकी कोणीही आपले मत मत व्यक्त करू शकतो किंवा उत्तर देऊ शकतो.
मागील १०० आठवडे एकही सुट्टी न घेता कट्टा दर रविवारी अव्याहतपणे सुरू आहे.यावेळी उपस्थितांनी माहिती अधिकारासंदर्भातील आपले प्रश्न व अडचणी मांडुन त्यावर चर्चा केली आजपर्यंत समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी तसेच आज माजी अधिका-यांनी कट्ट्यावर उपस्थिती लावली आहे.इथे कुणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नसल्याने सर्वजण एकाच पातळीवर चर्चा करतात. त्यामुळे प्रश्न कितीही गंभीर असला तरी चर्चा मात्र खेळी मेळीच्या वातावरणात होते .
कट्याच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागले असले, अनेकांचा माहिती मिळवण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी सर्वात महत्वाचे म्हणजे कट्ट्यामूळे शासकीय कामकाजाबद्दल किंवा अधिकारी कर्मचा-यांबाबत वाटणारी भिती नाहीशी झाली आणि एक प्रकारचे धैर्य निर्माण झाले अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.आगामी काळातही हा कट्टा असाच सुरू रहाणार आहे.