रत्नागिरी -कोकणचा समुद्र किनारा आता पर्यटकांनी फुल असताना राजापूरमधील साखरी नाटे समुद्रकिनारी १७ फूट लांबीचा महाकाय व्हेल मासा लाटांसोबत वाहत आला . आणि आज शनिवारी या माशाला पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबतच पर्यटकांनी मोठीच गर्दी केली . आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा मासा समुद्र किनारी आला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या माशाची लांबी १७ फूट तर रुंदी ४ फूट आहे. करड्या रंगाची कातडी आणि अंगावर पांढरे ठिपके असे रुप असलेल्या या माशाबाबत संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. या माशाचा लिलाव केला जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या समुद्रात व्हेल माशांचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे. पंधरावड्यापूर्वीच सिंधुदुर्गच्या समुद्रात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे दिसले होते. विशेष म्हणजे तब्बल १०० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या समुद्रात ब्ल्यू व्हेलचे दर्शन झाले होते.