‘वूमन्स् इन हेल्थकेअर प्रोफेशन’ परिषदेचे उद्घाटन
पुणे :
‘महिलांना वेदना समजण्याची दैवी शक्ती असते, कामाचे व्यवस्थापन, संयम, सतत आत्मपरीक्षण हे गुण असल्याने महिलांनी आरोग्य, फार्मसी आणि हेल्थकेअर कम्युनिकेशन या क्षेत्रात यश मिळवावे’ असा सल्ला ‘सोरेंटो हेल्थकेअर’च्या मॅनेजिंग पार्टनर सुझान जोझी यांनी आज दिला.
‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ आणि ‘असोसिएशन्स ऑफ फार्मास्युटीकल टीचर्स ऑफ इंडिया’ (एपीटीआय) यांच्या कडून संयुक्तपणे आयोजित ‘अॅप्टिकॉन- 2016 (वूमेन्स फोरम)’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज सुझान जोझी, ‘असोसिएशन्स ऑफ फार्मास्युटीकल टीचर्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. महेश बुरांडे, डॉ. वंदना पत्रावळे (असोसिएशन्स ऑफ फार्मास्युटीकल टिचर्स ऑफ इंडिया, वुमेन फोरमच्या निमंत्रक), एम.सी.ई.सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्राचार्य डॉ. कीरण भिसे (अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सुझान जोझी बोलत होत्या.
ही एकदिवसीय परिषद आझम कॅम्पस असेंब्ली हॉल येथे मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध फार्मसी महाविद्यालयातून 300 तज्ज्ञ सहभागी झाले होते. तसेच उद्योजक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सुझान जोझी म्हणाल्या, ‘वैद्यकीय क्षेत्रात महिलांना करिअरच्या चांगल्या संधी आहेत. डॉक्टर होण्यापलीकडे औषध निर्मिती, फार्मसी, फार्मा कम्युनिकेशन हेल्थ केअर कम्युनिकेशन क्षेत्रात महिलांच्या कामाची गरज आहे. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांद्वारे त्या चांगले यश मिळवून समाजालाही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.’
डॉ. महेश बुरांडे (‘असोसिएशन्स ऑफ फार्मास्युटीकल टीचर्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष) यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र भांबर, डॉ. प्रवीण चौधरी, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, मुनव्वर पीरभॉय, मुमताझ पीरभॉय, डॉ. सुनीला धनेश्वर उपस्थित होत्या.
डॉ. कीरण भिसे यांनी प्रास्ताविक केले. महिलांना स्पर्धात्मक युगात अनेक आव्हानांना, ताण आणि विकारांना सामोरे जावे लागत असून, त्यावर विचार होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.