‘हृदया’साठी धावा – केम्बर्लि शाह
पुणे: “आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी ठेवायचे असेल तर चालणे, धावणे आणि व्यायाम करणे हेच एकमेव पर्याय असू शकतात.” असे अमेरिकेतील प्रख्यात फीटनेस ट्रेनर केम्बर्लि शाह हिने आज सूसरोड, पाषाण येथील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना सांगितले.
फिट आणि निरोगी राहण्यासाठी. तसेच त्याचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अवरबाउन्स’ या जीम व फिटनेस संस्थेने आज मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये २ वर्षांच्या मुलांपासून ते ७० ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत जवळ जवळ हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. जवळ जवळ २१ किलोमीटर धावणे हे लक्ष्य येथे ठेवण्यात आले होते. या मॅरेथॉनला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेची प्रख्यात फिटनेस ट्रेनर केम्बर्लि शाह ही खास अमेरिकेहून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. तसेच धावणे हे आपल्या हृदयासाठी गरजेचे आहे याचे महत्वही तिने यावेळी सांगितले.
“माणसाला चालणे आवडो किंवा न आवडो त्याने कमीत कमी ७ ते ८ किलोमीटर चाललेच पहिजे. आताची जीवनशैली अतिशय तणावपूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याचा ताण लगेच आपल्या हृदयावर पडतो. आजकाल ३० ते ३५ वयातील लोकांनाही हृदयविकार होतात. आपले हृदय आपणच निरोगी ठेवू शकतो, त्यासाठी औषधी घेण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला तर ते आपल्याच हिताचे आहे.” असे आवाहन केम्बर्ली हिने यावेळी तेथे सहभागी झालेल्या नागरिकांना केले. तसेच फिट राहिल्यामुळे आपला आत्मविश्वास आणि तग धरण्याची क्षमता वाढते त्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे असेही तिने सांगितले.
‘अवरबाउन्स’ या फिटनेस जिम संस्थेमधील मैदानी उपक्रमांपैकी मॅरेथॉन हा एक उपक्रम आहे. हा उपक्रम दरवर्षी ‘जागतिक हृदय दिवस’ या निमित्ताने राबविला जात असतो. ‘अवरबाउन्स’ या संस्थेचे संस्थापक दीपक अवटे यावेळी म्हणाले की, “मॅरेथॉन हा एक फक्त उपक्रम नसून सामाजिक संमेलनाचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक व्यक्तीला धावण्यासाठी प्रोत्साहन तर मिळतेच तसेच त्याची धावण्याची क्षमतादेखील वाढते. आम्ही या उपक्रमात कुठल्याही व्यक्तीला विजेतेपद देणार नाही आहोत. कारण मुळात हा उपक्रम आम्ही धावण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आयोजित करीत असतो. लोकांना व्यायाम, चालणे किंवा धावणे याविषयी कुठलीही भीती वाटू नये यासाठी राबवीत असतो.” जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिटनेस चे महत्व पोहोचले पाहिजे हा एकमेव उद्देश असल्याचेही ते म्हणाले.