विशाखापट्टणम – दक्षिण भारतात हुदहुद वादळाने विशाखापट्टणममध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. वादळामुळे आतापर्यंत 22 जण ठार झाले आहेत. येथे पाण्याची बाटली 100 रुपये तर दुधाची 80 रुपये लीटरप्रमाणे विक्री सुरू झाली आहे शहरातील विमानतळाची सर्वाधिक हानी झाली असून, मोबाईल आणि वीजव्यवस्था कोलमडली आहे.
रुग्णालयांत वादळातील पिडितांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच रोजच्या जीवनावश्यक वस्तु मिळवण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी विशाखापट्टणमचा दौरा करीत आहेत. पाहणी केल्यानंतर मोदी एक आढावा बैठक घेणार असून विशाखापट्टणमचे पुर्वसन करण्याबाबतची रुपरेषा मोदींसमोर मांडली जाणार आहे.\शक्यतेच्या तुलनेत या वादळामुळे कमी प्रमाणात नुकसान झाले. त्याचे कारण म्हणजे हवामान विभागाने अत्यंत तंतोतंत माहिती दिली होती. हवामान विभागाचा याबाबतचा अंदाज नासापेक्षाही तंतोतंत ठरला. नासाने 10 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीत, वादळ 12 ऑक्टोबरला आंध्रच्या किनारपट्टीवर येणार असे सांगितले होते. पण निश्चित स्थळाबाबत काहीही सांगण्यात आले नाही. तसेच वादळ ताशी 185 किमी वेगाने येईल आणि फायलीन वादळाप्रमाणे त्याचे स्वरुप असेल असेही नासाने म्हटले होते. त्याउलट हवामान विभागाने 6 ऑक्टोबरलाच याबाबत माहिती दिली होती. तर 10 ऑक्टोबरला हे वादळ विशाखापट्टणच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे सांगितले होते. हवेचा वेग ताशी 195 किमी असेल असे सांगितले होते. तसेच फायलीनएवढी तीव्रता नसेल असेही सांगण्यात आले होते.