पुणे- शहरात आतापर्यंत तब्बल १७८ रुग्णांना याची लागण झाली असून, १६ जण अत्यवस्थ आहेत. आज शहरात हडपसर भागातील अमित दाभाडे (वय ३५) तर घोरपडी येथील किशोर बोराटे (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
गेल्या दीड महिन्यात शहरात स्वाइन फ्लूने तब्बल २0 बळी गेले आहेत. पुण्यासह राज्यातही स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढू लागला आहे. गुरुवारी राज्यात स्वाइन फ्लूचे १0९ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे स्वाइन फ्लूचे सर्वांत जास्त २२ बळी गेले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत तब्बल १७८ जणांना याची लागण झाली असून, १६ जण अत्यवस्थ आहेत. महापालिकेतर्फे आतापर्यंत चार हजारांहून अधिक टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शहरात टॅमिफ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख एस. टी. परदेशी यांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रतिकार करण्यासाठी ‘त्रिगुणी ही लस सीरम इन्स्टिट्यूटतर्फे गेल्यावर्षी विकसित करण्यात आली होती. या लसीची मुदत संपल्याने डिसेंबरमध्ये सुमारे दीड लाख डोस नष्ट करण्यात आले; पण आता त्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील १५-२0 नवीन बॅचमध्ये उत्पादन करण्यात येणार आहे, असेही सीरम इन्स्टिट्यूटतर्फे कळविण्यात आले आहे.