स्वतःचा कचरा स्वतःच जिरविण्याचा सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या प्रकल्पाचा आदर्श सर्वांनी घ्यावा-गिरीश बापट.
पुणे-आपण निर्माण केलेला कचरा आपणच जिरवला पाहिजे ही भावना स्तुत्य असून शहरातील अन्य गृह्संकुलांनी ही याचा आदर्श घ्यावाअसे आवाहन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी येथे केले
कर्वेनगर मधील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने उभारलेल्या ओला कचरा विघटन
प्रकल्पाचे उद्घाटन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना बापट म्हणाले ‘२०० सदनिका असणार्या सोसायटीने सामाजिक जाणीवेतून हा प्रकल्प उभारला आहे,यासाठी सोसायटीला दहा लाख रुपये खर्च आला आहे,मात्र आपण निर्माण केलेला कचरा आपणच जिरवला पाहिजे ही भावना स्तुत्य असून शहरातील अन्य गृह्संकुलांनी ही याचा आदर्श घ्यावा व असे प्रकल्प उभारावेत,मी पालक मंत्री झाल्यापासून शहरातील ज्या प्रमुख समस्या सोडविण्याचा निर्धार केला आहे त्यात कचरा समस्या,वाहतूक समस्या,सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे,मेट्रो यासारखे अनेक विषय आहेत,मात्र सर्वात गुंतागुंतीची समस्या कचऱ्याची असून यासाठी नागरिकांनी ही पुढाकार घेतला पाहिजे.आज जरी या प्रकल्पासाठी खर्च झाला असला तरी मनपा करात ५% सवलत सर्व सदनिका धारकांना मिळणार असून यातून निर्माण होणारे खात विकून ही खर्च भागवता येणार आहे.आम्ही गेल्या सहा महिन्यात सुमारे पासष्ठ हजार मेट्रिक टन कचरा खत म्हणून पुणे परिसरातील शेतीत पुरविला आहे असे ही ते म्हणाले.कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा असे प्रकल्प उभारणे श्रेयस्कर आहे.सुका कचरा गोळा करण्याच्या व त्याचे मार्केटिंग करण्याच्या संदर्भात ही आमची चर्चा सुरु असून इच्छा शक्ती असली तर सगळे प्रश्न सुटतात,आणि सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खा.अनिल शिरोळे म्हणाले आपली संस्कृती खूप चांगली आहे असे म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेतो मात्र आपला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकू नये ही आपली संस्कृती आपण अनेक वेळा विसरतो,मात्र या गृहसंकुलातील नागरिकांनी व अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी ही संस्कृती जोपासली याबद्दल त्यांचे अभिनंदन.पुण्यात कचऱ्याची समस्या मोठी आहे,मात्र याच्या सोडवणुकीसाठी पुणे महापालिकेने व नागरिकांनी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे जे काम नागरिकांकडून अपेक्षित आहे ते आपण सुजाण नागरिक म्हणून केले पाहिजे.आपले पुणे स्वच्छतेच्या बाबतीत देशात एकतिसावी आहे.त्यामुळे केंद्र शासनाचे स्वच्छतेचे अनुदान जर आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर आपला कचरा आपल्या भागातच जिरवला जाईल यासाठी काम करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या की मी कचरा विघटन प्रकल्प व जलपुनर्भरण प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करेन.मी काही सोसायत्यांमध्ये गांडूळ खत प्रकल्पासाठी मदत केली असून नुकतीच एका सोसायटीस असा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले आहे.नजीकच्या काळात कोथरूड मध्ये अनेक ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यास मी कटिबद्ध आहे,
सुवर्णरत्न गार्डन सोसायटीतील प्रकल्प उभारणारे earth care equipments चे रमेश वाघ यांनी या प्रकल्पाच्या वैशिष्ठ्यांची माहिती देतानाच १२०० स्क़.फुट,जागा उपलब्ध केल्यास १० टन प्रती दिन पर्यंतचा कचरा जिरविण्याचा प्रकल्प आपण उभारू शकतो असे सांगितले.या वेळी ,कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उमेश माळी,प्रसिद्ध नाट्य कलावंत श्रीकांत मोघे,संदीप खर्डेकर,रवि अनासपुरे,डा.संदीप बुटाला,बापू मेंगडे,मंदार घाटे,गणेश पासलकर,प्रशांत हरसुले.दिलीप उंबरकर,शिवराम मेंगडे इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर अशोक खांडेकर यांनी सूत्र संचालन व ए.रमेश राय यांनी आभार मानले.