स्मार्ट सिटी प्रकल्पात सहभागी होणे आवश्यक सर्वानुमते तोडगा काढावा : क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आवाहन
पुणे : नागरी जीवनात अमूलाग्र सुधारणा होण्यासाठी, शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराने स्मार्ट सिटी प्रकल्पात सहभागी होणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करावी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पात सहभागी होण्यासाठी एकमताने निर्णय घ्यावा. सर्वांच्या हिताचा हा निर्णय असल्याने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या आत त्वरित तोडगा काढून सर्वानुमते या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे, की स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्यातून निवडलेल्या दहा शहरांत पुण्याचा समावेश झाला होता, ही सर्व पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्मार्ट सिटी उपक्रमात सर्व पुणेकरांचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग आहे. या प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर शहरासाठी होणारे फायदे लक्षात घेता या उपक्रमाला व्यापक जनाधार लाभला आहे. गेल्या दोन दशकांत पुण्याची शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आदी विविध क्षेत्रांत भरभराट झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन सामान्य नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे देशाच्या उत्पादन क्षमतेत भर पडण्यास मोठी मदत झाली आहे.
आपल्या पुण्याची मोठी बलस्थाने आहेत. देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणाºया शहरांत पुण्याचं सहावं स्थान आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत पुणे आघाडीवर आहे. चांगले जीवनमान असलेले पुणे हे देशातील दुसºया क्रमांकाचे शहर आहे. तरुण तत्रज्ञानंना आकर्षित करण्यात पुण्याचा जगात दुसरा क्रमांक आहे. उद्योगव्यवसायासाठी पुणे देशातील चौथे सर्वोत्तम शहर आहे. सर्वांत सुरक्षित शहरांत पुण्याचा पाचवा क्रमांक आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी तर आहेच, तसेच या शहराला संगीत, साहित्य, रंगभूमी, चित्रकला आणि चित्रपट क्षेत्राची मोठी परंपरा आहे. विधायक चालवली, उपक्रम व उत्सव प्रधान म्हणूनही पुण्याची ओळख आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात सहभागी झाल्यास पुण्याला पुढील लाभ होतील. येथील वाहतूक व्यवस्थापनात अमूलाग्र बदल होऊन सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. माहिती-तंत्रज्ञान (आयटी), डिजिटीलायजेशनमध्ये मोठ्या सुधारणा होतील, ई गव्हर्नन्स आणि नागरी सहभागातून उत्तम प्रशासकीय कारभार निर्माण होईल, पर्यावरण रक्षणास मदत होईल, जल, कचरा, ऊर्जा व्यवस्थापन प्रभावी होईल, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उत्तम होतील. त्यामुळे पुण्यात रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध होतील.
या उपक्रमातील महत्त्वाचा घटक म्हणून क्रेडाई पुणे मेट्रोचा स्मार्ट सिटी प्रकल्पाला संपूर्ण पाठिंबा आहे. या पुण्यासाठी लाभदायक संकल्पनेचा प्रचार आम्ही करतच आहोत. जागतिक बाजारपेठेत भारत प्रभावी भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशांतर्गत राज्यांत आणि शहरांत व्यावसायिक स्पर्धा आहे. त्यामुुळे या स्पर्धेला समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्वोत्तम सोयी, नागरी सुविधा, प्रभावी शासन व प्रशासन ही पुण्याची काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. शहराचा सुनियोजित सर्वांगीण विकास, सुशासन आणि समृद्धी आणि भरभराटीसाठी सर्व पुणेकर नागरिक, या प्रकल्पातील सहभागी घटक आणि राजकीय पक्षांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाला पाठिंबा देऊन त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.