‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’उपक्रमात 125 गटांचा सहभाग
पुणे :
‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात 125 गटांनी सहभाग घेतला. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात महिला गटांच्या सामाजिक प्रकल्पांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला’ अशी माहिती ‘स्माईल’च्या संस्थापक आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये, नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढला. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना-नागरिकांना कार्यरत करणार्या ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाचा जागतिक पर्यावरण दिन दि. 5 जून 2014 रोजी शुभारंभ करण्यात आला होता.
या उपक्रमातंर्गत पुण्यातील मोहल्ल्यांमध्ये किमान 5 व्यक्तिंची ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ समिती स्थापन करण्यात आली असून, या गटाची प्रमुख एक महिला होती . या पाच सदस्यांमध्ये 3 महिलांचाही सहभाग होता. परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टींमधील समस्या निवारण करण्यासाठी व एकात्मता वाढविण्यासाठी योगदान दिले. कचरा वर्गीकरण, शक्य असेल तिथे गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यास पुढाकार घेणे, वीज-पाणी-इंधन बचतीसाठी जनजागृती करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण उत्सव साजरे करणे, यासाठी शालेय व महाविद्यालयीन वर्ग, ज्येष्ठ व स्थानिक मंडळे यांना प्रोत्साहीत करून या उपक्रमात त्यांचा सहभाग घेणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे आयोजन हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. हा उपक्रम स्पर्धात्मक होता.
वृक्षारोपण, परिसर सुशोभिकरणापासून सामाजिक समस्यांवरील उपक्रमांत या महिला आणि नागरिक अन्य 100 घरांपर्यत जागृतीसाठी पोहोचले. नागरिकांच्या श्रमदानातून व महापालिकेच्या सहकार्यातून तो परिसर स्वच्छ व सुंदर करणे, यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची कार्यवाही करण्यात आली.
खा.वंदना चव्हाण म्हणाल्या,‘जगातील अनेक शहरांप्रमाणेच आपल्या पुणे शहराचे देखील वेगाने नागरिकरण होत असताना आपण पहात आहोत, तसेच त्यामुळे खालावत असलेला जीवनमानाचा स्तरदेखील अनुभवत आहोत. शहरातील गतिमान जीवनशैलीमुळे आपण अनेक समस्यांना नकळत आमंत्रण दिले आहे. वाहतुकीची कोंडी, वाढते प्रदूषण, कचरानिर्मिती त्यामुळे होणारे सार्वजनिक आरोग्याचे गंभीर प्रश्न, फोफावलेली गुन्हेगारी, बेलगाम बांधकामे, वनराईचा र्हास या व अशा अनेक समस्या इतर शहरांप्रमाणेच पुण्यालादेखील भेडसावत आहेत. नागरिकरणाचा जीवसृष्टिवरच अनिष्ट परिणाम होत आहे, तसेच आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे, होत आहे या परिस्थितीत बदल करायला हवा, ही जाणीव आहे आणि त्यासाठी काहीतरी करण्यासाठीच ‘चेंज मेकर्स’ हा कार्यक्रम आखला आहे.
या उपक्रमाला पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभले आहे. बुधवार, दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे या उपक्रमातील स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत नागरिकांचे गट तयार करून निवडलेल्या परिसरातून विकास घडविण्यासाठी पुढाकार घेऊन चांगले उपक्रम परिसरात राबविण्यासाठी ‘चेंज मेकर्स’ च्या या उपक्रमात सहभागी झालेल्या महिला पुण्यातील सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे- कर्वेनगर, पर्वती, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा -वानवडी परिसर या विभागातील होत्या.
चेंजमेकर्सच्या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांना गटप्रशिक्षण, गट प्रमुखांची निवड कशी करावी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागते, स्वत:मध्ये नेतृत्व गुण विकसित करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते. विविध उपक्रमांची माहिती ‘स्लाईड शो’ द्वारे देण्यात आली होती. ‘चेंजमेकर्स’च्या प्रमुख समन्वयक नीला विद्वांस आणि त्यांच्या सहाय्यक संजिवनी जोगळेकर व प्रदीप्ता कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले.
‘छोटी छोटी पावले मोठे बदल घडवून आणतात, यावर विश्वास असणार्या नागरिकांसाठी ‘चेंजमेकर्स’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण बदल घडवू शकतो, याचा अनुभव या उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येक महिलेने आणि नागरिकांनी अनुभवले. सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्थानिक पातळीवर पाऊले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुण्यात सुरू केला, असेही खा.वंदना चव्हाण यांनी सांगितले.