पुणे- अन्याय आणि अत्याचाराने घुसमटणा-या स्त्रीला मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अन् आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा असा “कँडल मार्च” हा सिनेमा येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. चाणक्या क्रिएशन्स अन् K4 एन्टरप्रायझेस यांची निर्मिती असलेल्या “कँडल मार्च” क़डे स्त्रीत्वाच्या हुंकाराचा उद्गार म्हणून आपल्याला पाहता येईल.
शांततापूर्वक माध्यमातून अन्यायाचा विरोध महत्त्वाचा आहे, पण वेळीच अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची नितांत गरज असते, हे उद्देश्य डोळ्यांसमोर ठेवून कँडल मार्चची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक जाणिवा आणि सामाजिक भान असल्यामुळे भोवताली घडणा-या ज्वलंत प्रश्नांना रूपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न “चाणक्य क्रिएशन्स” करत आहे. कारण आजच्या घडीला ज्यांच्या हातात सूत्र आहेत अन् ज्यांना या प्रश्नांवर तोडगा काढता येईल त्यांचे लक्ष या कलाकृतींमार्फत वेधून घेण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असेल. जेणेकरून “चाणक्य क्रिएशन्स” सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणा-या कलाकृतींचे व्यासपीठ यापुढील काळात होईल.
आजच्या घडीला देशभरात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना मग ती सेक्स स्कँडल्स असोत वा अन्य त्यामधील प्रश्नांना एका वेगळया स्तरावर मांडण्याचा केलेला प्रयत्न म्हणून कँडल मार्चचे महत्त्व वेगळे आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिकेत तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक आणि सायली सहस्त्रबुद्धे या अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे. पुरूषी अहंकार आणि समाजातील अन्यायकारी खलनायकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे तो अभिनेता निलेश दिवेकर. विविध जाहिरातींमधला चेहरा फरारी की सवारीमध्ये अन् गुटरगूसारख्या मालिकांनंतर ब-याच वर्षांनी मराठी सिनेमात काम करत आहे, ही जमेची बाजू म्हणायला हवी. केवळ अन्याय आणि अत्याचाराने ग्रासलेला हा रंगहीन सिनेमा नाही तर आशिष पाथरे आणि सायली सहस्त्रबुद्धे यांच्या रोमॅण्टिक ट्रॅकने या सिनेमात प्रेमाचा रंग भरलेलाही आपल्याला बघायला मिळणार आहे.
अभिनयाचं खणखणीत नाणे वाजवणा-या या सिनेमामध्ये घुमणा-या संगीताचा सूरही तितकाच अंतर्मुख करणारा आहे. तीन गाण्यांचे प्रसंग ज्याप्रकारे चित्रित कऱण्यात आले आहेत, ते पाहता प्रेक्षकांना ठेका धरायला लावताना काळजाला हात घालण्याचा प्रयत्न यामधून केला गेला आहे.
मंदार चोळकर रचित गाण्याला अमितराज सारख्या प्रतिभावंत संगीतकाराने स्वर बद्ध केले ख्यातनाम गायक शंकर महादेवन याने ‘निखारे…’ हे गाण गायल. लिटिल चॅम्प रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांच्या रोमॅण्टिक ‘सहर सहर…’ या गाण्याने चित्रपटाला एक रोमॅण्टिक टच दिला आहे.. आदर्श शिंदेने ‘काही केल्या’ हे गाण सुद्धा तितकंच काळजाला भिडणार आहे.
अभिरूची संपन्न कलाकृतीच्या निर्मितीमागे अंजली आणि निलेश गावडे यांचे खंबीर पाठबळ आहे तर सचिन देव यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन दरेकर यासारख्या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारलेली पटकथा अन् संवदेनशील संवादांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले नाही तरच नवल. मंदार चोळकर यांच्या गीतांना अमितराजच्या सूरावटींनी रंग भरले आहेत. छायाचित्रणाचा वेगळा अंदाज दाखवला आहे राजा सटाणकर यांच्यासारख्या कसलेल्या सिनेमॅटोग्राफरने तर संतोष फुटाणे यांसारख्या अनुभवी कलाकाराने कलादिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.
मनोरंजन करताना सामाजिक प्रश्नांना व्यासपीठ देणारी कलाकृती म्हणून “कँडल मार्च”कडे पाहता येईल.