पुणे :- सुरक्षित वाहतूक दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, पुणे पोलीस, प्रादेशिक परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 27 व्या रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचे उदघाटन आज फर्ग्युसन महाविद्यालयात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, प्राचार्य डॉ.आर.जी.परदेशी, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील आणि अभिनेत्री केतकी माटेगांवकर उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, आपल्या देशात रस्ते अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये तरूणांची संखअया जास्त आहे. वास्तविक हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. कारण तरूण मुलांचा अपघाती मृत्यू होणे फार हानीकारक आहे. त्यासाठी रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे.
आयुष्यात विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरूणाईने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. कारण आई-वडील, कुटुंबियांच्याबरोबरच राज्य आणि देशाची धुरा तरूणांच्यावर आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
आमदार मेधा कुलकर्णी यांनी वाहतूक नियमांचे पालन स्वत:पासून सुरु करुन त्याचा इतरांमध्ये आदर्श निर्माण केल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले.
विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे नागरिकांना का सांगावे लागते याचा प्रत्येकाने विचार करावा. त्याचबरोबर सर्वांनी वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करावे असे सांगितले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये विविध सामाजिक संस्था, खाजगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला असून या सर्वांच्या सहभागाने अभियान यशस्वी होईल असे सांगितले. यावेळी वाहतूक उपायुक्त सारंग आवाड आणि केतकी माटेगावकर यांचीही भाषणे झाली.
यावेळी वाहतूक नियमांच्या पालनाविषयी चांगल्या सूचना करणाऱ्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हेल्मेट देऊन सत्कार करण्यात आला व वाहतुक सुरक्षेविषयक साहित्याचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.