मुंबई-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने मोठी पावले उचलली आहेत. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारीचा राजीनामा दिला.
आज दुपारी २ च्या सुमारास विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. पक्षाच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाचे एकमताने समर्थन केले. या निवडीनंतर सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्या म्हणून अधिकृतपणे काम पाहतील.
पक्षाच्या या बैठीकमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते. पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. दोन्ही प्रस्ताव या बैठीकत मंजूर करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवारांच्या गटनेतेपदी निवडीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्री हे पत्र राज्यपालांकडे सोपवणार असून, आज संध्याकाळी राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अवघ्या 10 मिनिटांत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच राज्याचे महत्त्वाचे ‘अर्थमंत्रीपद’ देखील होते. आता सुनेत्रा पवार हे खाते स्वतःकडेच ठेवणार की पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

