बारामती -सुधीर फडकेंचा ‘गीतरामायण ‘वारसा अलौकिक आणि अभिमानाने मिरवण्याची बाब आहे असे सांगत हा वारसा पुढे नेणाऱ्या फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले
पाहू यात शरद पवार यांनी नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …
गीतरामायण या अजरामर कलाकृतीचा हिरक महोत्सव काल विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात पार पडला. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून स्वतः गायलेले गीतरामायण ही एक अजरामर कलाकृती आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने असेलेलं सभागृह हे विद्या प्रतिष्ठानचे सांस्कृतिक केंद्र आहे. सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीतरामायण सादर केले. सुधीर फडके यांची पुढची पिढी हा वारसा पुढे नेतेय याचा मला आनंद होत आहे.
मी शिक्षण घेत असताना माझे मॅट्रिकला असतानाचे मुख्याध्यापक श्रीधर गोगटे, हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याचाही मला आत्यंतिक आनंद झाला. गोगटे सरांबरोबर बोलताना आपोआपच त्यावेळच्या आठवणींना उजाळा देता आला. जवळजवळ चार पिढ्यांनी एकत्र बसून गीतरामायणाचा आस्वाद घेतला, ही गोष्टही तितकीच अभूतपूर्व.
‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेने गीतरामायणचा हिरक महोत्सव आणि माझी पंचाहत्तरी याचे निमित्त साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. पण मी सांगू इच्छितो, “तुम्ही माझ्या अमृत महोत्सवानिमित्त माझा सत्कार करून मला आठवण करून देताय की, माझे वय ७५ वर्ष झाले आहे. पण मला अजून समाजाच्या सर्व घटकांसाठी तरूणांना सोबत घेऊन काम करायचे आहे. मी कधीही काम करताना वय पाहत नाही.” हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन…



