“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.
गिर्यारोहणासाठी सध्या ऑस्ट्रेलिया खंडात असलेल्या भारताच्या आनंद बनसोडे याने नुकतेच सिडनी च्या आकाशातून १४००० फुट उंचीवर उडत असलेल्या विमानातून उडी मारून एक आगळा वेगळा विक्रम केला. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च १० शिखरे सर करून आनंद नुकताच सिडनी मध्ये आला असून लगेच एक आगळे वेगळे साहस त्याने केले आहे. त्याच्या सोबत त्याच्या टीममधील इतर ३ जोडपी शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश व तारकेश्वरी राठोड, साची सोनी, मनीषा वाघमारे यांनीही फ्री-फॉल उडी घेत “हिफॉरशी” मिशन अर्थपूर्ण बनवत आम्ही सर्व काही करू शकतो हे दाखवून दिले.
उडत्या विमानातून उडी मारून करत असलेल्या वेगवेगळ्या कसरतीना स्काय डायव्हिंग असे म्हणतात. ऑस्ट्रेलिया मधील सिडनी मध्ये आनंदने स्काय डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला, ऑस्ट्रेलियातील मित्र व गाइड रॉब याच्या मदतीने या साहसाची आखणी केली गेली. विमान १४००० फुट उंचीवर गेल्यावर जवळपास २०० किमी प्रति तास वेगाने खाली येत पक्षाप्रमाणे आकाशात विहार करण्यचा चित्तथरारक अनुभव आनंदने घेतला.
२०११ मध्ये अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग , याशिवाय अनेक शिखरे सर केली असून आता आनंदच्या कार्यात अजून एका साहसाची भर पडली आहे.
“अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग केले, बर्फाचे पर्वत चढलो पण आता हे हवेतील साहस मला खूप आनंद देवून गेले.विमानातून उडी मारताना थोडी भीती वाटली पण त्या वेळी आईचे सकारात्मक विचार आठवले. व क्षणाचाही विलंब न करता १४००० फुटावरून ढगात झेप घेतली व २०० किमी या वेगाने जमिनीकडे निघालो. हा अनुभव खूप काही शिकवून गेला. ढगांच्या मध्ये उडताना व पृथ्वीला इतक्या वरून पाहताना खूप विस्मयकारक आहे.”