पुणे – घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालावर “बहिष्कार‘ टाकण्याच्या भूमिकेवर प्रकाशक ठाम असून, मराठी प्रकाशक परिषदेच्या सोमवारच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे यंदाचे संमेलन पुस्तक प्रदर्शनाविनाच भरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आता संमेलनाचे संयोजक आणि साहित्य महामंडळाशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मराठी माणसांचा वावर नसलेल्या पंजाबमधील घुमान येथे 88वे साहित्य संमेलन होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशकांची बैठक झाली. संमेलनस्थळी मराठी माणसे नसल्याने सुरवातीपासून प्रकाशकांमध्ये नाराजीचा सूर होता. प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून पुस्तकांना उठाव मिळणार नसल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांच्या बैठकीत “बहिष्कार‘चा ठराव झाला होता. त्यामुळे या संमेलनाला न जाण्याचा प्रकाशकांचा प्रयत्न होता. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. तीन महिन्यांपूर्वी महामंडळाशी पत्रव्यवहारही केला होता; परंतु महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने “बहिष्कारा‘चा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रकाशकांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मराठी प्रकाशक परिषदेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी म्हणाले, की संमेलनस्थळ जाहीर झाल्यापासून परिषदेची भूमिका कायम आहे. “बहिष्कारा‘चा निर्णय अंतिम आहे. शिवाय आता कोणाबरोबरही चर्चा केली जाणार नाही.