नागपूर – साहित्य, संस्कृती आणि कला हे क्षेत्र माणसाला वैचारिकदृष्ट्या समृध्द करीत असतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पद्मगंधा प्रतिष्ठान, साहित्य विहार, नागपूर यांच्या संयुक्त वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग, खासदार अजय संचेती, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, पद्मगंधा प्रतिष्ष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे, स्वागताध्यक्ष प्रा. भाऊराव बिरेवार, पंकज चांदे, डॉ. प्रज्ञा आपटे, माजी कुलगुरु एस.टी.देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, इंटरनेटच्या वापरामुळे वाचनाचा प्रवास ज्ञानाकडे जाण्याऐवजी माहितीकडे जात आहे. ज्ञानाधारित समाज रचना जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत मूल्यांची जोपासना होणार नाही. यासाठी साहित्याची महती जपली पाहिजे. देशासमोर विविध विचार आणि अनेक आव्हाने आहेत. म्हणून साहित्य क्षेत्राची आवश्यकता पूर्वीपेक्षाही अधिक आहे. पद्मगंधा प्रतिष्ठानचे साहित्य क्षेत्रातील कार्य चांगले आहे. अशा संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.