मुंबई –
राज्यात सावकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याचे मोठे रॅकेट सुरु आहे. त्यामुळे या सर्व किडनी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे व जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने १७१ कोटींची तरतूद केली होती. पण औरंगाबाद जिल्हाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात याची अमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी १७१ कोटींची तरतूद करूनही फक्त १ कोटी २९ लाख खर्च करण्यात आले. यामागचे रहस्य काय आहे ते सरकारनेच स्पष्ट करावे, असे मलिक यांनी म्हटले.
औरंगाबादमधील संचेती नामक एकाच सावकाराला ७९ लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली. सरकार भाजपशी संबंधित सावकारांना शोधून शोधून कर्जमाफी देत आहे का, असा सवालही मलिक यांनी केला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जळगावात शिवसेनेच्या एका आमदाराने प्रश्न केला होती की भाजपच्या एका वजनदार मंत्र्यांची किडनी कुठून आली? श्रीलंकेत त्यांनी किडनीचे प्रत्यारोपण करताना हॉस्पटलमध्ये त्याची नोंद का नाही? कुठल्या व्यक्तीने ती किडनी दान केली याची नोंद का नाही? सत्ताधारी पक्षाचेच आमदार ज्यावेळी असे प्रश्न निर्माण करतात त्यावेळी सरकारला या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक आहे, असे मलिक यावेळी म्हणाले.
सावकारांनी कर्जापायी शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याचा प्रकार फक्त अकोल्यातच नाही. तर राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांच्या किडनी काढण्यात आल्या आहेत. सरकारने सावकारापासून कर्जमुक्तीची घोषणा करून देखील शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त झालेला नाही. कुठेतरी हे सर्व किडनी काढणाऱ्या सावकारांना मदत करण्याचा कार्यक्रम आहे काय ? याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले

