सातारा(जिमाका) : निरोगी राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असून आपले आरोग्य आपल्या हाती हा मंत्र जोपासल्यास उपचार करुन घेण्यापासून सुटका मिळेल, असे सांगतानाच जिल्हा रुग्णालयात सुरु झालेला कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला निश्चितपणे फायदेशिर ठरेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी केले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयामध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराड यांच्या सहकार्याने कॅन्सर बाह्य रुग्ण विभागाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. रामचंद्र जाधव, कर्करोग उपचार तज्ज्ञ डॉ. आनंद गुडूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, एनसीडी विभाग प्रमुख डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष नांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, आजार होवू नये, शरीर निरोगी रहावे यासाठी जीवनात आहाराला खूप महत्व आहे. त्यादृष्टीने आपली वाटचाल असावी. आपण काय खातो, काय खायला पाहिजे याचे चिंतन मननही करायला हवे. तंबाखू, सिगरेट सारख्या व्यसनांना दूर ठेवण्यासाठी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. रोगाची जेथे लागण झाली, तेथे गुणकारी उपचारही केले जात असतात. परंतु रोग होवूच नये यासाठी प्रतिबंधात्मक वाटचाल आयुष्यामध्ये ठेवायला हवी. कॅन्सरच्या रुग्णांवर अत्यंत वेदनादायक उपचार केले जातात. अशावेळी नातेवाईकांनी त्यांना जगण्याचा आधार, धिर दिला पाहिजे. जिल्हा रुग्णालयात सुरु झालेला कॅन्सर बाह्य रुग्ण विभागाचा फायदा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला निश्चितपणे होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपचार यावर सातत्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही ते शेवटी म्हणाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे म्हणाले, कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. त्यासाठी खूप महाग उपचार केले जातात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसतात. महाराष्ट्र शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग सुरु करुन सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये कराड येथील वैद्यकीय महाविद्यलायाच्या मदतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी डॉ. आनंद गुडूर हे स्वत: येऊन रुग्णांवर उपचार करणार आहेत. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही औषधोपचार मोफत करण्यात येईल. रुग्णांनी जास्तीत जास्त या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, स्वागत, प्रास्ताविक डॉ. सुधीर बक्षी यांनी केले. डॉ. गुडूर यांनी रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होत्या.