सातारा(जिमाका) :- अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून जप्त केलेला गुटखा, पानमसाला, सुंगधी तंबाखू आदींचा 57 लाख 56 हजार 703 रुपयांचा साठा आज येथील सोनगाव येथील कचरा निर्मुलन केंद्रात जाळून नष्ट केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजंेद्र रुणवाल यांनी दिली.
राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे वाहतूक करताना, विक्री करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जानेवारी 2014 ते जुलै 2015 या कालावधीत जिल्ह्यामध्ये 38 ठिकाणी छापे घालून विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला, सुंगधी तंबाखू आदींचा 57 लाख 56 हजार 703 रुपयांचा साठा जप्त केला होता. आज सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा निर्मूलन केंद्रात जाळून नष्ट केला. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे, क्षेत्र अधिकारी इंदिरा गायकवाड, नगरपालिका आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी एस. एम. साखरे, अन्न सुरक्षा अधिकारी दत्ता साळुंखे, इम्रान हवालदार, यु.एस. लोहकरे, एस.बी. अंकुश, व्ही. व्ही. रुपनवर, आदींच्या पथकाने केली होती.
सहायक आयुक्त श्री. रुणवाल यावेळी म्हणाले, या पुढेही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. बेकायदेशीर वाहतूक करणे किंवा गुटखा विक्री करणाऱ्यांबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
साडे सत्तावन्न लाखांचा बेकायदा जप्त गुटख्याचा साठा नष्ट
Date:

