सलमान खान च्या शिक्षेला हाय कोर्टाची स्थगिती -जेलवारी टळली
मुंबई – हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला सेशन कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याला जामीनासाठी नव्याने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्याला आधी कोर्टासमोर हजर होऊन, त्यानंतर जामीन मिळवावा लागेल. जवळपास दीड तास चाललेल्या युक्तीवादानंतर सलमानची तुरुंगवारी टळली आहे. सलमानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी केलेल्या युक्तीवादासमोर सरकारी वकीलांचा युक्तीवाद कुचकामी ठरला.
सलमानच्या वकिलांनी युक्तिवादात एक वगळता सर्व कलमं जामीनपात्रं असल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी दिवंगत साक्षीदार रवींद्र पाटील याच्या जबाबाची प्रत पाहण्याची मागणी केली. तसेच सलमानच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध का? त्यामागचा आधार काय? अशी विचारणा न्यायधीशांनी सरकार पक्षाला केली आहे. तसेच माझ्या कोर्टासमोर सुनावणी सुरू असताना, निकाल लागेपर्यंत त्याला तुरुंगात पाठवण्याची गरज काय असे निरीक्षणही न्यायाधीशांनी मांडले. हे निरीक्षण आहे निकाल नाही, असेही त्यावेळी न्यायाधीशांनी सांगितले.
सत्र न्यायालयाच्या निर्णयचा आधार काय असेही कोर्टाने विचारले. या जामीनासाठी दिग्गज वकिलांची फौज सलमानच्या कुटुंबीयांनी उभी केली आहे. दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने कोर्टाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
हिट अँड रन प्रकरणी पुढची सुनावणी 15 जूनला होणार असून जूनमध्ये खटला संपवण्याची तयारी ठेवा असं कोर्टाने बजावलं आहे. दरम्यान सलमान खानला परदेशवारी करण्यापूर्वी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे.