पुणे- धनकवडी येथील बालाजीनगरमधील काशीनाथ पाटील नगरच्या ओढा पुलावर पार्किंग केलेल्या दहा दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. रात्रीच्यावेळी पुलाच्या वापरात निर्माण होत असलेला अडथळा अथवा दहशत माजवण्याच्या उद्देशाने जाळपोळ केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी गुन्हेगारी कारवायांनी अशांत झालेल्या बालाजीनगरमध्ये पोलिसांनी नियंत्रण मिळवल्यानंतर शुक्रवारी घडलेली जाळपोळीची घटना दुदैवी मानण्यात येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर सगळीकडे शांतता असताना, बालाजीनगर परिसरातील काशिनाथ पाटीलनगर येथे ओढापुलावर उभ्या केलेल्या दहा दुचाकींना आग लावण्यात आली. शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास धूर आणि भडकलेल्या आगीने ताई कॉम्प्लेक्स व क्लासिक अपार्टमेंटमधील नागरिक जागे झाले. सुरक्षा रक्षक अकबर मोमीनसह संजय आळेकर यांनी पोलिस व अग्निशमन केंद्राला माहिती दिली. जमलेल्या नागरिकांनी बाजूच्या काही दुचाकींसह रिक्षा व मोटारीला आगीपासून दूर केले. नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कात्रज अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत सात स्कूटर आणि तीन दुचाकी जळून भस्मसात झाल्या होत्या. या घटनेत निलेश पांचाळ, संतोष मदभावे, पांडुंरंग गायकवाड, मगनलाल भाटी, गणेश कर्वे, उमेश रावलेकर, मिलिंद धर्माधिकारी, रवीकुमार नायर, संजय वैराट यांच्या दुचाकींची राख झाली आहे.