पुणे : ‘पापा हो या मम्मा हो, या मम्मा की अम्मा हो, सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे’, या गाण्यावर ताल धरीत ससाणेनगरमधील ज्ञानप्रबोधिनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वीजबचतीची गुरुवारी (दि. 17) प्रतिज्ञा केली. सोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना वीजबचतीची आवश्यकता व फायदे याबाबत माहितीही दिली.
निमित्त होते महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. ज्ञानप्रबोधिनीच्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेसात वाजता प्रार्थनेनंतर उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक व सचिव श्री. रतन माळी, कार्यकारी अभियंता श्री. दिनेश अग्रवाल, मुख्याध्यापक मेघना पतके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वीजबचतीचे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्यांसह सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते यांनी प्रात्यक्षिकांसह वीजबचतीवर मार्गदर्शन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिवानी कट्टीमनी, शितल किर्तने या विद्यार्थींनींनी अतिशय मुद्देसुद व सुंदर मनोगतातून वीजबचतीचा संदेश दिला. या दोघींसह शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना श्री. मनोहर कोलते यांनी कौतुक स्वरुपात एलईडी बल्ब भेट दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हाती असलेले वीजबचतीचे संदेश फलक लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. अजिनाथ चव्हाण, श्री. अरविंद कन्हेरे, नारायण दर्शिले, महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत, सहाय्यक अभियंता श्री. प्रमोद सुरवसे आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी ओव्हाळ, रेशमा सातपुते यांनी केले. वीजबचतीचा संदेश देणार्या व लोकप्रिय झालेल्या ‘सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.