पुणे :
‘भारतातील प्रगती दरडोई उत्पन्नामधून प्रतीत होत आहे. भारतीय कंपन्या जगात पुढे जाऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतातील विद्यार्थी, उद्योजक आणि मध्यमवर्गाने जागतिक भान ठेऊन सकारात्मक आणि नावीन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांवर भर द्यावा’ असे आवाहन ‘सँडविक एशिया लि.’चे कार्पोरेट सल्लागार डॉ.संजय बसू यांनी शुक्रवारी केले.
‘चेकमेट -15’ या 7 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ तर्फे करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.
.‘व्यवस्थापनातील प्रभावी आणि नाविन्यपूर्ण पद्धती’ या विषयावरील ‘चेकमेट 15’ ही दोन दिवसीय परिषद शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी व शनिवार 21 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ऑडिटोरियम (आझम कॅम्पस ) येथे सुरु आहे. ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक डॉ. आर. गणेसन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.रोशन काझी, प्रा.जावेद खान उपस्थित होते. भाग्यश्री चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ.बसू म्हणाले, ‘बाजारपेठेच्या गरजेनुसार नावीन्यपूर्ण कल्पना जन्माला येतात आणि बाजारपेठेला उपयुक्त वाटल्या तरच त्यांना वाव मिळतो. हे लक्षात घेतले तर भारतातील प्रबळ अशा उद्योजक, मध्यमवर्ग आणि विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर चमकण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन नावीन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा केला पाहिजे. भारतातील खासगी क्षेत्र जागतिक स्पर्धेत उतरले असून अग्रस्थानी आहे. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या चांगली कामगिरी नोंदवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पी.ए.इनामदार म्हणाले, ‘भारतीय व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पैसा हा अडथळा नाही तर कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रामाणिकपणा आणि संशोधक वृत्ती मात्र प्रगतीसाठी आवश्यक आहे.’
‘सँडविक एशिया लि.’चे कार्पोरेट सल्लागार डॉ. संजय बसू हे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा.एस. रंगनाथन, दीपक नंदा, किरण भट, अपूर्व नागपाल, तरुण मालविया, अमित अगरवाल, डॉ.दीपक मल्होत्रा, डॉ.रणजीव मानराव, झुबीन पूनावाला, संदीप दवे, पंकज कुमार हे वक्ते परिषदेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत.
तर विविध चर्चासत्रांना डॉ. प्रशांत गुंडावार, डॉ.डी.बी.भारती, डॉ.ए.यू.खान, डॉ.सचिन कदम, डॉ. अमोल गोजे, डॉ.ए.बी.राव हे अध्यक्षस्थान भूषवित आहेत.