पुणे- वेदकाळापासून असलेल्या प्राचीन संस्कृत भाषेचा हिंदू, जैन व विशेषत: बौध्द धर्मामध्य झालेला अभ्यास
आणि त्याबरोबरच भारताबाहेर झालेला अभ्यास याचे टप्पे लक्षात घेऊन संस्कृत भाषेचे महत्व लक्षात घ्यायला
हवे असे मत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी व्यक्त केले.
शनिवारवाडा कला महोत्सवाच्या तिसऱ्या पुष्पामध्ये डॉ. बहुलकर यांचा त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार
मिळाल्याबद्दल महोत्सवाचे संयोजक आमदार विजय काळे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन
विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी प्रसिध्द पखवाज वादक शशिकांत भोसले
यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. बहुलकर म्हणाले, मी काम करताना त्या कामाचे निश्चित फळ मिळेल अथवा त्यासाठी पुरस्कार मिळेल
असा कधी विचार केला नव्हता. साहित्य अकादमी पुरस्कार मिळेल हेही मला माहिती नव्हते. मी केलेल्या
कामाची पावती या पुरस्काराच्या रुपाने मला मिळाली आहे. खरतर पुणे शहरात शंभरी गाठलेले संस्कृत व
इतर क्षेत्रात खूप काम केलेले विद्वान आहेत त्यांच्या समोर मी काहीच नाही अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, संस्कृत भाषेचा विचार करताना ही एक छोटी भाषा आहे असे म्हटले जाते. परंतु ५ हजार वर्षांपूर्वी
प्राचीन काळात भारतात व भारताबाहेर पसरलेली भाषा आहे. अगदी अफगाणीस्थानपासून ते जपान पर्यंत या
भाषेचा प्रसार झाला आहे. वेदकाळापासून या भाषेला महत्व आहे. हिंदू, बौध्द व जैन धर्मामध्ये संस्कृत
भाषेविषयी विशेष कामगिरी केली आहे. भारतातील विविध धर्मातील लोकांनी संस्कृतचा अभ्यास तर केलाच
परंतु भारताबाहेरही संस्कृतचा जो अभ्यास झाला त्याचे टप्पे लक्षात घेणे आवश्यक आहे. तिबेटमध्ये साडेपाच
हजार संस्कृत ग्रंथांचा अनुवाद झाला आहे. मात्र हे ग्रंथ भारतात उपलब्ध नाही. त्यासाठी आपण काही पावले
उचलली असल्याचे डॉ. बहुलकर यांनी यावेळी सांगितले.
या सत्कारानंतर महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी ‘जिव्हाळा’ निर्मित ‘सुनेच्या राशीला सासू’ या विनोदी
नाटकाने रसिकांना पोट धरून हसायला लावले. ज्योतिष राशीतील १२ राशींवर आधारित असलेल्या या
नाटकामध्ये चंद्र राशींचा सासू व सुनेवर झालेला परिणाम, विविध राशीच्या सुना आणि सासू यांचे स्वभाव
विशेष, त्यातून त्यांच्या नात्यातील संबंध व त्यातून निर्माण झालेले विनोदी किस्से असलेल्या या मनोरंजनाच्या
नाटकाने रसिकांची माने जिंकली. या नाटकाचे दिग्दर्शन आनंद म्हसवेकर यांनी केले असून योगिनी पोफळे,
मनोहर सोमण नयना आपटे या कलाकारांनी आपल्या अभिनयातून विनोदाचा अविष्कार घडविला.