पुणे-
व्यक्ती व्यक्तींमधील, दोहोंमधील सुसंवाद योग्य व सुसह्य करणेकरिता आवश्यकतेनुसार अभिव्यक्तीत बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन . डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
पुणे महानगरपालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘‘व्यक्ती अभिव्यक्ती” या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महानगरपालिकेतील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील ‘‘व्यक्ती अभिव्यक्ती” या विषयावर डॉ. संजय उपाध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यक्तींच्या मनात विविध विचार असतात, परिस्थिती निहाय मन व्यक्त होत असते. साध्या वेषातील व्यक्ती व त्याच व्यक्तीने कर्तव्यावर बसताना परिधान केलेला पोशाख, पेहराव हा त्याच्या व्यक्तीमत्वात बदल घडवून आणत असतो. त्यानुसार त्याची अभिव्यक्ती व्यक्त होत असते.
लोकसंपर्क, जनसंपर्क सारख्या सेवेत असलेल्या व्यक्तींनी सेवेत कर्तव्य बजावत असताना संपर्कात येणाऱ्या नागरिकांशी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकाभिमुख सेवा दिली पाहिजे. आदरार्थी सन्मानपूर्वक संवाद करुन त्यांची कामे करणे याच सवयी आत्मसात केल्या पाहिजेत. व्यक्तीने अभिव्यक्ती सादर करताना मी कोण आहे हे पाहिले पाहिजे. इतरांबाबत निर्णय प्रक्रिया अथवा मत व्यक्त करताना अभिव्यक्तीबाबत विचार केला पाहिजे, त्या दृष्टीने स्वपरिक्षण केले पाहिजे. काही प्रसंगी काळ हाच उत्तर देत असतो. श्वास, विश्वास, आत्मविश्वास हे श्वासातूनच येत असते, श्वासावर नियंत्रण अर्थात आनापान, ध्यानधारणा या पध्दतीचा अवलंब करुन आपल्या श्वासाबाबत श्वास घेणे, रोखणे, सोडणे या प्रक्रिया रोज कराव्यात व स्वपरिक्षण केले पाहिजे कारण झोप व श्वास योग्य होत असेल तर जीवन सुसह्य होईल. त्यामुळे अभिव्यक्ती व्यक्त होत असताना समोरच्या व्यक्तीला योग्य, सुसह्य वाटेल,आनंददायक वाटेल अशीच अभिव्यक्ती असावी. स्वभाव बदलता येत नसेल तर अभिव्यक्तीत बदल केला पाहिजे. व्यक्तीरेखे बरोबर असलेल्या विसंवादामुळे वाद होतात त्यामुळे व्यक्तीरेखा ओळखणे आवश्यक आहे. मानवी मनाच्या विविध अभिव्यक्ती प्रकारांबाबत अनेक उदाहरणे, तसेच दैनंदिन, कौटुंबिक, शासकीय कार्यालये अशा विविध स्तरांवरील उदाहरणे देऊन डॉ. उपाध्ये यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनाकरिता उपायुक्त मंगेश जोशी तसेच सुरेश परदेशी, आशिष चव्हाण, प्रशांत चव्हाण व विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.