पुणे-
“महाभारतासारख्या विशाल महाकाव्य़ाच्या संक्षिप्त अनुवादामधून त्या काव्य़ात वर्णन केलेली खरीखुरी
कथा, तत्कालीन समाजाचे नीतिनियम आणि चालीरीती, धर्म, तत्त्वज्ञान, ह्या आणि इतर अनेक गोष्टींची माहिती
वाचकास मिळत नाही, कारण अनुवादकास ज्या गोष्टी अडचणीच्या किंवा अवघड वाटतात, त्या गोष्टी वगळून
अनुवाद करणे त्यास शक्य होते. यापूर्वीही महाभारताचे संपूर्ण इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यातही
काही भाग अनुवादकांनी वगळला आहे. तसेच ते अनुवाद महाभारताच्या चिकित्सापूर्ण संशोधित आवृत्तीवर
आधारलेले नाहीत. भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या आवृत्तीवर आधारित असा, त्यातील
कोणताही भाग न वगळता इंग्रजी अनुवाद मी केला असून त्याच्या आत्तापर्यंत १५ ते २० हजार प्रती खपल्या
आहेत.” असे विचार नीती आयोगाचे सदस्य, ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीयविद्येचे अभ्यासक श्री बिबेक
देबरॉय यांनी आज येथे मांडले.ऐंशी हजार श्लोकांच्या संपूर्ण महाभारताचा इंग्रजी अनुवाद केल्याबद्दल भांडारकर
प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष सदानंद फडके यांच्या हस्ते देबरॉय यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री देबरॉय यांनी ते संस्कृत संबंधी लेखनाकडे कसे वळले हे सांगून त्यांच्या या
लेखनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला तसेच त्यांच्या पुढील लेखनाची दिशा विशद केली. संस्कृत ग्रन्थांच्या
शब्दशः आणि सविस्तर अनुवादाचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाभारताचा अनुवाद करतानाचे त्यांचे
अनुभव त्यांनी श्रोत्यांपुढे मांडले.
संस्थेचे प्रभारी मानद सचिव प्रा. श्रीकांत बहुलकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध
उपक्रमांची माहिती दिली. गोखले इन्स्टिट्यूटचे प्रा. प्रदीप आपटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भांडारकर
संस्थेने 1920 ते 1966 या काळात महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीचे 19 खंड प्रकाशित केले आहेत.
संस्थेने श्री देबरॉय यांचा सत्कार करण्यामधील औचित्य श्री फडके यांनी या प्रसंगी विशद केले. संस्थेच्या नियामक
मंडळाचे अध्यक्ष श्री. अभय फिरोदिया हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर
यांनी आभार मानले. निबंधक डॉ. श्रीनन्द बापट यांनीसूत्रसंचालन केले.