पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. रामराव
मुंडे यांनी बुधवारी (ता. 02) कार्यभार स्वीकारला. याआधी ते बारामती परिमंडलाचे
मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
मुळचे बीड जिल्ह्यातील देवगाव येथील शेतकरी कुटुंबातील श्री. मुंडे 1982 मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात
कनिष्ठ अभियंता म्हणून लोणीकंद 400 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्ग (जि. पुणे) येथे रुजू झाले. याच पदावर त्यांनी
अंबाजोगाई, बीड येथेही काम केले. त्यानंतर सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता अशा
पदोन्नतीवर ते बीड, भांडूप, ठाणे, वाशी, नेरूळ आदी ठिकाणी कार्यरत होते. कार्यकारी अभियंता म्हणून श्री. मुंडे यांनी
नवी मुंबई परिसरातील लघु व उच्चदाब वर्गवारीतील वीजचोरी रोखून वीजहानी 5.85 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची
कामगिरी केली आहे. श्री. मुंडे अधीक्षक अभियंता म्हणून 2008मध्ये मुंबई मुख्यालयात डिस्ट्रीब्यूशन स्पेशल प्रोजेक्ट
सेलमध्ये कार्यरत होते. त्यानंतर 2009 मध्ये मुख्य अभियंता म्हणून लातूर परिमंडलात रुजू झाले.
लातूर परिमंडलात मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी कृषीपंपासाठी सुलभ व तातडीने वीजजोडणी मिळावी यासाठी
‘महावितरण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाच्या यशामुळे तो राज्यभरात राबविण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील वसई, विरार, वाडा या भागातील पायाभूत वीजयंत्रणेच्या जाळे सक्षम करून दुर्गम भागातील
वीजपुरवठा सुरळीत करण्यात त्यांचे योगदान आहे. मुख्य अभियंता म्हणून श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात लातूर,
कल्याण, बारामती परिमंडलात ग्राहकसेवा, ग्राहकाभिमुख विविध उपक्रम, वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व वीजहानी कमी
करण्यासोबतच महसूल वाढीसाठी झालेली सांघिक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पुणे परिमंडलात वेगवान व
उत्कृष्ट ग्राहकसेवा तसेच इन्फ्रा दोनसह विविध योजनांमधील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य
अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी सांगितले.