एकेकाळी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांना तेव्हा स्वप्नातही वाटलं नसेल, की त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग एक दिवस कॉर्पोरेट कंपन्यांच्या जगातून जाईल! त्यांनाच काय, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही कधी वाटलं नव्हतं, की एक दिवस भक्तीचं ‘मार्केटिंग’ केलं जाईल, श्रद्धेचं ‘ब्रँडिंग’ होईल आणि ‘बॉटम लाइन’साठी अध्यात्म विकलं जाईल. पण हेच सध्याचं वास्तव आहे. देवापेक्षाही ‘स्वामी, बाबा, महाराज’ जास्त महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच सामान्य भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी तिचा फायदा घेऊन मांडलेला बाजार यावर बोचरं भाष्य करणारा ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ (चिन्मय मांडलेकर) हा एक साधा-सरळ आणि सामाजिक जाणिवा जिवंत असलेला तरुण असतो. आजीच्या (नीना कुलकर्णी) तालमीत तयार झालेला… एमएसडब्ल्यू करून समाजसेवा करत असतो. मात्र, त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं, की मूल्यं- नितीमत्ता यांची कास सोडून तो थेट पैशांच्या मागे लागतो. वाट्टेल ते झालं, तरी भरपूर पैसे कमवून यशस्वी व्हायचं या त्याच्या महत्त्वाकांक्षेला नचिकेत (सुबोध भावे) हा चलाख बिझनेसमन खतपाणी घालतो. आलिशान लाइफस्टाइल जगता यावी म्हणून आजकाल सगळेजण मान मोडून काम करतात, भरपूर पैसे कमावतात आणि मग मनाला शांती नाही म्हणून रडत बसतात. अशांच्या भाबड्या श्रद्धेचा योग्य वापर करून खोऱ्याने पैसे ओढता येतील हे त्याच्या धूर्त मनानं ओळखलेलं असतं. म्हणून मग, नचिकेत सिद्धार्थलाच ‘स्वामी’ बनवून लाँच करतो, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’. एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे तो या स्वामीचं उत्तम पॅकेजिंग आणि मार्केटिंग करतो आणि त्याच्यासाठी ब्रँडिंग अॅक्टिव्हिटीजही आखतो. हा स्वामी लोकांचा विश्वास मिळवण्यात कसा यशस्वी होतो, नचिकेतचं ध्येय पूर्ण होतं का ? सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का ? नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं ? वगैरे प्रश्नांची उत्तर देताना सिनेमा आणखी रंजक होतो.
प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढवत नेणाऱ्या या सिनेमाची संकल्पना विजय मुंडे यांची आहे, तर प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमासाठी कथालेखक, गीतकार आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. मॅटर या सिनेंमाच्या यशस्वी निर्मितीनंतर पूनम शेंडे यांच्या ‘सारथी एंटरटेनमेंट’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अतिशय वेगळ्या प्रकारच्या या कथेला दिग्गज कलाकारांची साथ मिळाल्यामुळे सिनेमा लक्षवेधी झाला आहे. सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या तरुण, आघाडीच्या अभिनेत्यांच्या जुगलबंदीचा अनुभव प्रेक्षकांना यात घेता येईल, तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी यां दिग्गज कलाकारांचा अभिनयही सिनेमाची जमेची बाजू आहे. स्वर्गीय कलाकार विनय आपटे यांचा अविस्मरणीय अभिनयही ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’मध्ये पाहायला मिळणार आहे. नवोदित चेहरा आणि आश्वासक अभिनयगुण असेलली संस्कृती खेर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे, विनोद खेडकर हे लोकप्रिय कलाकारही सिनेमात आहेत.
सिनेमाची सांगीतिक आघाडी हिंदी इंडस्ट्रीतल्या नामवंतांनी सांभाळलेली आहे. ‘दिल तो पागल है’’ सारख्या सिनेमाला संगीत देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांनी ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ ला कर्णमधुर संगीत दिले आहे, तर प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय चक्रवर्ती आणि गायक सुखविंदर सिंग यांनी ती गायली आहेत. पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे.
राजस्थानसह भारतातल्या विविध निसर्गरम्य ठिकाणी सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं असून विक्रम अमलाडी यांच्या छायाचित्रणाने तो आणखी सुखद बनला आहे. कलादिग्दर्शन सिद्धार्थ तातूस्कर यांचे असून रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषेची जबाबदारी सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी निभावली आहे. सिद्धार्थ घाडगे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असून लाइन प्रोड्युसरची जबबादारी विनोद सातव व आश्विनी तेरणीकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. विवेक वाघ हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.
दमदार कथा आणि लक्षात राहाणारा विषय, अनुभवी, कसलेलं दिग्दर्शन, अवीट गोडीचं संगीत आणि कलाकारांचा समर्थ अभिनय यांनी सजलेला ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी प्रदर्शित होत आहे.