शैक्षणिक गुणवत्तेसह औद्योगिक क्षेत्राशी संवाद हवा डॉ. जी. डी. यादव यांचे मत; एमआयटीचा पदवीग्रहण समारंभ
पुणे, दि. 23 : “अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम बव्हंशी संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेवर आधारलेला असतो. पदवीप्राप्त केल्यानंतर उद्योगक्षेत्रात नोकरी करण्याचा किंवा स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या दोन्ही पर्यायांत यशस्वी होण्यासाठी गुणवत्तेसह औद्योगिक क्षेत्राशी संवाद असणे महत्त्वाचे ठरते,” असे मत मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरु डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केले.
माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) पदवीग्रहण समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईरचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा. बी. एम. पाटील व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. जी. डी. यादव म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात आयआयएम, आयआयटीसारख्या संस्था अग्रस्थानी असतात. मात्र, राज्यपातळीवरील विद्यापीठांसह इतर अनेक विद्यापीठे मागे पडतात. काही विद्यापीठे नामांकनासाठी आवश्यक माहिती पुरवित नाही. विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी संशोधन, उत्तम प्रशासन, शैक्षणिक गुणवत्ता आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंध यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या युवा सहकार्यांना नियमित प्रोत्साहन दिले पाहिजे. प्राध्यापकवर्गाचा नेता उत्तम असेल, तर या सर्व गोष्टी आपोआप घडून येतात व गुणवत्तेच्या यादीत यायला विद्यापीठांना अथवा महाविद्यालयांना शक्य होते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “शिक्षण पूर्ण झाल्यावर करिअरच्या विश्वात प्रवेश केल्यानंतर महाविद्यालयातून मिळालेल्या आदर्श मूल्यांची उजळणी केली पाहिजे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमात शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींची, विचारांची आठवण ठेवत कार्य केल्यास यशप्राप्ती होते. स्वत:ला जाणून घ्यायचे असेल, आपली जबाबदारी ओळखायची असेल, तर स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचावीत. माता-पिता आणि गुरुजनांना कधीही विसरु नये.”
डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनघा खरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एम. पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवीधर स्नातकांनी पदवी ग्रहण केली.