पुणे- शिवसेनेचे नेते आम्हाला भेटले, पण त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.तसंच, राज्यात भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही तयार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे शेतमालाच्या दरावरून व शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, मागील एक-दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव सरकारने खूपच कमी जाहीर केला आहे. हा दर अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. मागील काळात आमचे सरकार होते त्यापेक्षा हा दर सुमारे 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. कापसाचे दर यंदा सरासरी हजार ते दीड हजार रूपयांनी उतरले आहेत. 2012 साली कापसाला प्रति क्विंटल 6 हजार तर, 2013 साली 5000 हमी भाव आमच्या सरकारने दिला होता. यंदा मात्र तो 3900 ते 4000 इतका खाली आणला आहे. कापूस फेडरेशनने कापूस खरेदी करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने कापूस खरेदी करणे सुरु करावे. याचबरोबर नाफेडला अर्थसहाय्य करावे. साखरेचे दर यंदा खाली आले आहेत. असे असले तरी ऊस उत्पादकांना रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. नव्या सरकारने बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत. त्याच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन लोकप्रतिनिधींच्या हाती बाजार समित्याचा कारभार सोपवावा असेही पवारांनी सांगितले.
शिवसेना-भाजपमध्ये सरकार स्थापनेवरून सुरू असलेला काथ्याकूट काही केल्या संपत नाहीए. आधी मंत्रिपदाच्या संख्येवरून, मग खात्यांवरून, मग उपमुख्यमंत्रिपदावरून आणि नंतर केंद्रातील मंत्रिपदावरून या जुन्या मित्रांमध्ये सातत्यानं खटके उडत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोघांचाही प्रयत्न सुरू असताना, या दबावतंत्राचा भाग म्हणूनच, काही शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी नेत्यांची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. परंतु, प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. त्याला काही तास उलटत नाहीत, तोच शरद पवारांनी त्यांना उताणं पाडायचा प्रयत्न केलाय.
शिवसेनेचे नेते आम्हाला भेटले. त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, पण त्यांनी कुठलाच प्रस्ताव दिला नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संजय राऊत खरं बोलताहेत की पवार,हा प्रश्न निर्माण झाला आहे
राज्यातील मतदारांनी यावेळी कुणालाच स्पष्ट बहुमत दिलं नाही. अशावेळी राज्यात स्थिर सरकार यावं, या उद्देशानंच आम्ही भाजपला पाठिंबा जाहीर केला होता आणि अजूनही आम्ही त्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. भाजप-शिवसेनेशी युती झाल्यास सुंठेवाचून खोकला गेला, असंही ते हसत-हसत म्हणाले. भाजपच्या विचारधारेचा इथे संबंधच नाही, राज्याच्या हिताचा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला पाठिंबाच देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.वेगळ्या विदर्भाबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांनी नापसंती व्यक्त केली. कुठलाही मुख्यमंत्री शपथ घेताना राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याचं अभिवचन घेतो. असं असताना, ते वेगळी भूमिका घेत असतील, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीचे निकाल कुणाला संपवत नसतात. मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा भाजपचे फक्त दोन खासदार होते. तीच भाजप आज केंद्रात सत्तेत आहे, याकडे लक्ष त्यांनी वेधले
यंदा कापसाचे हमीभाव हजार ते दीड हजार रूपयांनी राज्य सरकारने कमी केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना भाजप सरकारने न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केले. याचबरोबर ऊस उत्पादकांनाही रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हानही पवार यांनी केले.