शेतकऱ्यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड – गिरीश बापट
शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार शरद जोशी यांच्या निधनाने शेतक-यांचा पाठीराखा हरपला आहे , अशा शब्दांत अन्न, नागरी पुरवठा , अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शरद जोशी हे आयुष्यभर संघर्ष करत राहिले. शेतकरी, शेतमजूरांबरोबरच त्यांनी सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठीही लढा दिला. जोशी हे जागतिक शेती
फोरमचेही सक्रीय होते. शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरावी, यासाठी ते आग्रही होते. शासनाने शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, यासाठीही जोशी आग्रही होते.
खासदार म्हणूनही जोशी यांनी राज्यसभेत शेतक-यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. असा हा शेतक-यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांचा लढवय्या गेला, अशा शब्दांत बापट यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शेतक-यांचा आधारवड गेला – आमदार दिलीप वळसे-पाटील
उच्च पदावरील सनदी अधिका-याची नोकरी सोडून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी आयुष्य पणाला लावणारे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार शरद जोशी यांच्या निधनाने शेतक-यांचा आधारवड गेला, अशा शब्दांत माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
वक्तीस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप कमी असावा, यासाठी जोशी आग्रही होते. शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी जोशी यांचा आयुष्यभर लढा सुरू होता . महिलांच्या विविध प्रश्नांवरही त्यांनी यशस्वी आंदोलने केली. राज्य सभेचे खासदार, केंद्रीय कृषी स्थायी समितीचे अध्यक्ष , जागतिक कृषी फोरम अशा विविध व्यासपीठांवरून जोशी यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. त्यांच्या निधनाने शेतक-यांबरोबरच महाराष्ट्राचेही मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.